Maharashtra Assembly Election 2024 । राज्यात विधानसभा निवडणूका असल्याने सध्या प्रचाराला वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यादरम्यान भाजप नेते सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका करताना जीभ घसरली. भारतीय जनता पक्षाचे जत विधानसभेचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत सदाभाऊ खोत यांनी ही टीका केली.
शरद पवार आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी बँका हाणल्या, कारखाने हाणले, तरी भागले नाही. तरीही भाषणांमधून महाराष्ट्र बदलायचा असे सांगत फिरतोय. तुला तुझ्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र करायचा आहे का? अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकारण तापले आहे. राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत असून शरद पवार यांचे पुतणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही हे वक्तव्य रुचलं नसून त्यांनी सदाभाऊ खोत यांनी केलेल्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अजित पवार यांनी एक पोस्ट शेअर करत सदाभाऊ खोत यांना सुनावले आहे.
अशात आता उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही माध्यमांशी बोलतांना सदाभाऊ खोत हा तर देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा आहे. असं म्हणत भाजप पक्षावर निशाणा साधला आहे.
Maharashtra Assembly Election 2024 । नेमकं काय म्हणाले संजय राऊत
ज्या माणसाने स्वतःचा चेहरा पाहावा. आपण समाजकारणात राजकारणात काय केलं मला कोणाशी व्यक्तिगत काही बोलायचं नाही. माननीय शरद पवार साहेब या देशाचे सर्वोच्च नेते आहेत. या सदा खोतच्या बापाने म्हणजे नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री यांनी बारामती जाऊन शरद पवार हे आपले कसे राजकीय गुरु आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा देश कसा घेत आहे हे वारंवार सांगितलं आहे. पवारसाहेबांचं बोट पकडून आम्ही कस राजकारण केलं हे सुद्धा मोदी यांनी सांगितलं
Maharashtra Assembly Election 2024 । सदाभाऊ खोत काय म्हणाले होते?
जतमधील महायुतीच्या सभेत बोलताना रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप आमदार सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. शरद पवार यांच्यावर टीका करताना खोत म्हणाले, “शरद पवार आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी बँका हाणल्या, कारखाने हाणले, तरी भागले नाही. तरीही भाषणांमधून महाराष्ट्र बदलायचा असे सांगत फिरतोय. तुला तुझ्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र करायचा आहे का?” अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत खोत यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.