युपीएच्या अध्यक्षपदाच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा यु-टर्न; म्हणाले, “मी असं म्हणालो नव्हतो पण…”

मुंबई : काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी करावे असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. यावरून काँग्रेसच्या नेत्यांची राऊतांनी नाराजी ओढवून घेतली आहे. शिवसेना यूपीएचा भाग नाही. त्यामुळे राऊत यांनी उगाच सल्ले देऊ नये, अशा शब्दांत काँग्रेसच्या नेत्यांनी राऊत यांच्यावर टीका केली. त्यानंतर, आत संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव करतआपण तसे विधान केले नसल्याचा दावा केला आहे.

युपीए म्हणजेच संयुक्त पुरोगामी आघाडीला मजूबत करण्याची गरज मी व्यक्त केली होती, असेही ते म्हणाले. संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विचारला. पटोलेंच्या टीकेला राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. कोणाला मी शरद पवारांचा प्रवक्ता वाटत असेल तर मला त्याचा आनंदच आहे. पवार यांच्या विधानांचे समर्थन करणं माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. शरद पवारांचे काम अतिशय मोठं आहे. त्यांच्या कामगिरीसाठी मोदी सरकारनं त्यांना पद्मविभूषण दिले आहे. मी शरद पवारांचा असण्याचा-नसण्याचा प्रश्न नाही, असे राऊत म्हणाले.

मी अनेकदा सोनिया गांधी, राहुल गांधींवर होणाऱ्या टीकेवरही बोललो आहे. त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावेळी मी सोनिया गांधी, राहुल गांधी यांचा प्रवक्ता होतो का? सोनिया, राहुल यांच्यावर टीका होत असताना ही सगळी मंडळी कुठे होती?, असा उलट सवालही त्यांनी विचारला. तसेच, सोनिया गांधींच्या जागेवर शरद पवारांना युपीएचे अध्यक्ष करावे, असे विधान मी केलेच नाही. केवळ, संयुक्त पुरोगामी आघाडीला बळकट करण्यासाठीचं ते विधान होतं, असेही स्पष्टीकरण राऊत यांनी दिले आहे.

राहुल गांधी यांना पप्पू म्हटलं जातं. त्यांची टिंगल केली गेली. सोनिया गांधी यांच्यावर टीका करताना विरोधकांनी मर्यादा ओलांडली. तेव्हा मी त्यांच्यासाठी पहाडासारखा उभा होतो. ही गोष्ट काँग्रेस नेते नाना पटोलेंना माहीत नाही. पण सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना त्याची कल्पना आहे, असं राऊत म्हणाले. यूपीए मजबूत करणं देशाची गरज आहे. ती कोण करतंय याला महत्त्व नाही. पण ती भक्कमपणे उभी राहायला हवी, असे मत राऊत यांनी व्यक्त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.