“बुरखाबंदी’वरून संजय राऊत यांची माघार

मुंबई- “बुरखाबंदी’च्या मागणीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सपेशल माघार घेतली आहे. बुरखाबंदीची मागणी शिवसेना किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाही. ते एक विश्‍लेषण आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

“बुरखाबंदीची जितकी चर्चा श्रीलंकेत झाली नाही. त्यापेक्षा अधिक चर्चा आपल्या देशात झाली. एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की, बुरखाबंदीची मागणी शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांनी केली नाही. श्रीलंकेतील घडामोडींवर एक विश्‍लेषण छापले इतकाच हा विषय’ असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बुरखा आणि नकाबबंदीची मागणी केल्यानंतर मोठी चर्चा झाली होती. मात्र ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचे शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी सांगितल्यामुळे पक्षात दोन तट पडल्याचे चित्र दिसून आले.

शिवसेना पक्षाच्या भूमिका नेत्यांच्या बैठकीतून ठरत असतात. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्या अंतिमत: ठरतात. त्यामुळे कदाचित हे चालू घडामोडींवर वैयक्तिक मत असेल. शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका नाही, असे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले होते.

त्यानंतर, बुरखाबंदीची मागणी शिवसेनेची नाहीच. श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्यानंतरची ती परखड भूमिका आहे. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा हीच भूमिका ठामपणे घेतली आहे. श्रीलंकेतील दहशतवादी हल्ला व तेथील सरकारने घेतलेल्या भूमिकेचा हे विश्‍लेषण आहे, असे ट्‌वीट करत संजय राऊतांनी आपली भूमिका मांडली होती.

दरम्यान, श्रीलंकेतील साखळी स्फोटानंतर राष्ट्रपती मैत्रीपाल यांनी घेतलेल्या बुरखाबंदीच्या निर्णयाची री शिवसेनेने ओढली शिवसेनेने श्रीलंकेप्रमाणेच भारतातही बुरखा आणि नकाबबंदी घालण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. मोदी अयोध्या दौऱ्यावर असल्याने रावणाच्या लंकेत जे घडले, ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? असा सवालही शिवसेनेने पंतप्रधान मोदींना केला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.