चंद्रकांत पाटलांच्या मानहानीच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले,”तुमच्याकडे भरपूर पैसे…”

मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामधील वादानंतर चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक होताना पाहायला मिळत आहे.  चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्याविषयी केलेल्या  आरोपावरून  त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात येईल आणि त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा  सव्वा रुपयांचा दावा ठोकणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांची मानहानी सव्वा रुपयाची नक्कीच नाही अशी मिश्किल टिप्पणी केली होती.

चंद्रकांत पाटील यांच्या टिप्पणी नंतर आता पुन्हा खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. “प्रश्न पैश्यांचा नाही तर स्वाभिमानाचा आहे. ५०० कोटींचा दावा ठोकू किंवा १००० कोटींचा ठोकू पण स्वाभिमानाची किंमत असते. त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि आम्हाला त्यांचे पैसे नकोत. त्यांच्या पैशांवर आमचं घर चालत नाही. आम्ही सामान्य लोकं आहोत. आम्ही आमचे पैसे कमवतो आणि खातो हे त्यांनाही माहिती आहे. त्यांना सगळीकडे पैसेच दिसतात. त्यांचा पक्ष पैसेवाल्यांचा पक्ष आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

किंमत थोडी वाढवायला पाहिजे होती असे फडणवीसांनी म्हटल्याचे माध्यमांनी म्हटल्यावर संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. “प्रश्न माझ्या किंवा त्यांच्या पैशाचा नाही. अब्रुची आणि स्वाभिमानाची किंमत होत नाही. तुम्ही खोटं बोललात तुमच्याकडे माहिती नाही. तुम्ही महाराष्ट्रासह सगळ्यांची बदनामी करत आहात. तुमचा तो राजकीय धंदा आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला कोर्टात खेचून जाब विचारावा लागेल.

रुपया सव्वा कोटी हे आकडे फक्त दाखवायला असतात. पण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचा प्रत्येक शिवसैनिकाचा एक सन्मान आहे. त्यांच्यावर ते टीका करु शकत नाही. तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि ते कुठून आले आहेत ते आम्हाला माहिती आहे. योग्यवेळी ती बाहेर काढू,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.