संजय राऊत जाणार आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीला

मुंबई – केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकरी मागील अनेक दिवसांपासून दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. शिवसेनेने या आंदोलनाला वेळोवेळी जाहीरपणे पाठिंबा दिला आहे. अशातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत गाझीपूरमधील आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत.

महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुख-दुःखात शेतकर्‍यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. त्यांच्याच सूचनेवरून आज गाझीपुर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहोत, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत आज दुपारी एक वाजता दिल्लीच्या सीमेवरील गाझीपुर परिसरात आंदोलनकर्ते शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत.

दरम्यान, शेतकरी आंदोलनस्थळांच्या परिसरातील इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आल्याचा आणि सरकारी यंत्रणांकडून त्रास दिला जात असल्याचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनांनी चक्का जामची घोषणा केली आहे. त्याबाबतची माहिती शेतकरी नेत्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

तसेच, केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. कृषी क्षेत्रासाठीच्या तरतुदींमध्ये कपात करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रियाही शेतकरी नेत्यांनी दिली. आता शेतकऱ्यांच्या चक्का जाम आंदोलनामुळे देशभरातील वातावरण ढवळून निघण्याची शक्‍यता आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.