मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या राजकीय कृतींबद्दल आता पश्चात्ताप करून काय उपयोग? ते स्वत: बारामतीमधून निवडणूक हरतील, असे भाकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोमवारी केले. बारामतीकरांना दुसरा आमदार मिळायला हवा. त्यामुळे ते माझ्या कामाची तुलना करू शकतील, असे वक्तव्य अजित पवार यांनी बारामतीमध्ये केले.
त्यामुळे ते यावेळी बारामतीमधून लढणार की नाही याविषयी सस्पेन्स निर्माण झाला आहे. इतर सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी ते करत असल्याची कुजबूजही सुरू आहे. पत्नीला बहिणीविरोधात निवडणूक लढवायला लावण्याची चूक केल्याची कबुलीही त्यांनी नुकतीच दिली. त्या पार्श्वभूमीवर, राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
तुम्ही तुमचं घर मोडलतं. तुमचा पक्ष सोडला. ज्येष्ठ नेते शरद पवार तुमच्या वडिलांसारखे आहेत. त्यांनी तुम्हाला सर्व काही दिलं. तरीही त्यांच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला, असे राऊत यांनी अजित पवार यांना उद्देशून म्हटले. बारामतीत आपण हरू याची जाणीव त्यांनाही झाली आहे, असा शाब्दिक टोलाही राऊत यांनी लगावला.