मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत आज लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहे. त्यांच्यावर उद्या अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्यावर काही दिवसांपासून ह्रदयाविकाराशी संबंधित उपचार सुरू आहे.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याने एप्रिल २०२० ही नियोजित वेळ करण्यात आली होती. परंतु, करोनाच्या प्रादुर्भावामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. यानंतर उद्या दुपारनंतर संजय राऊत यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, मागील वर्षी विधानसभा निकालापासून शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी पक्षाची बाजू लावून धरणारे संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या वैद्यकिय तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांत दोन ब्लॉक आढळून आल्याने त्यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्यांनी रूग्णालयातनूच काम करायला सुरुवात केली होती.