मुंबई- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावरुन राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं. भाजप विरुद्ध सेना असं चित्र बघायला मिळालं. याच दरम्यान अनेकांकडून नारायण राणेंना कोंबडीचोर म्हणूनही संबोधलं गेलं. मात्र यात अजून एक भर पडली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत राणेंची खिल्ली उडवली आहे.
राज्यात अनेक शहरांमध्ये कोंबडीचोर म्हणत राणेंच्या विरोध करत बॅनरबाजी बघायला मिळाली. त्या बॅनरमध्ये नारायण राणे आणि कोंबडीचा फोटोसुद्धा लावण्यात आला होता. ते बॅनर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. मात्र आता चक्क संजय राऊत यांनीच कोंबडीचा फोटो शेअर केला आहे. वाघाच्या जबड्यात अडकलेली तडफडणारी कोंबडी या फोटो दिसत आहे. या फोटोवर आजचा दिवस थोडक्यात.. असं लिहिलं आहे. तर, राऊत यांनीही टुडे… असे कॅप्शन या फोटोला दिले आहे.
Today pic.twitter.com/aykNVylSAZ
— Sanjay Raut (@rautsanjay61) August 25, 2021
या सगळ्या प्रकरणावर नितेश राणे यांनी पलटवार केला आहे. शिवसैनिकांनी केलेल्या पोस्टरबाजीनंतर आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा घरकोंबडा असा उल्लेख करणारा फोटो आपल्या ट्विटर शेअर केला. त्यामध्ये त्यांनी हा बॅनर कोण काढणार असाही सवाल केला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर केंद्रीय मंत्री नारायण राणेदेखील आक्रमक झाल्याचे दिसून आले. नारायण राणेंनी जामीन मिळाल्यानंतर सत्यमेव जयते… असे ट्विट केले आहे.
दरम्यान, अनेकवेळा आपल्या हटके स्टाईलने प्रतिक्रिया देणारे संजय राऊत यांनी ट्विट करत डिवचल्यामुळे राणे यावर काय प्रतिक्रिया देतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.