शरद पवार-नरेंद्र मोदी भेटीवर संजय राऊत म्हणाले…

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यात आज दिल्लीत बैठक झाली. शरद पवारांनी मोदींची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, असाही तर्क लावण्यात येत होता. त्यामुळे या भेटीने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार आणि मोदी यांच्या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. संजय राऊत यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. शरद पवार हे देशातील प्रमुख नेते असून कृषी आणि सहकार क्षेत्रातील जाणकार आहेत. त्यामुळे ते जेव्हा पंतप्रधानांना भेटतात तेव्हा त्यात राजकारण का काढता ?, असा सवाल राऊत यांनी केला.

संजय राऊत पुढं म्हणाले की, पवार अधूनमधून पंतप्रधानांना भेटत असतात. त्यामुळे यात काही राजकारण आहे, असं वाटत नाही.

याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी देखील पवार-मोदी भेटीचं कारण सांगितलं.  देशाच्या अनेक भागातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील लोकांनी शरद पवार यांना मागील महिन्या-दीड महिन्यात अनेक पत्र पाठवली. त्या सगळ्यांचा विचार करून केंद्र सरकारने यात लक्ष घातले पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेला योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत, यासाठी शरद पवार मोदींना भेटायला गेले, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.