मुंबई : येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे आगामी राजकारण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ऑपरेशन टायगर सुरू केले आहे. या अंतर्गत ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी, नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या सगळ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली.
अमित शाहसुद्धा आमच्या पक्षात प्रवेश करतील – संजय राऊत
शिंदे गटाचं कसलं ऑपरेशन टायगर? आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन टायगर. उद्या सत्ता नसेल तर यांचं अख्खं दुकान खाली होईल. मी मागेही म्हणालो होतो की, दोन तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या, अमित शाहही आमच्या पक्षात प्रवेश करतील. दोन तास ईडी आमच्या हातात द्या, अमित शाह मातोश्रीत येऊन प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत अशी टीका संजय राऊतांनी केली.
सूडबुद्धीने आम्ही कधी सत्ता राबवली नाही
ऑपरेशन टायगरचं आम्हाला काय सांगता? ईडी हातात आली की बावनकुळ्यांपासून सर्व तुम्हाला कलानगरच्या दारात दिसतील. सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका. सत्ता आम्हीही भोगली आहे. आम्हीही सत्तेत होतो. पण इतक्या विकृत पद्धतीने सूडबुद्धीने आम्ही कधी सत्ता राबवली नसल्याचे संजय राऊत म्हणाले.