मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. संसदेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या विरोधात भूमिका न घेतल्याने काही मुस्लिम नागरिकांनी ‘मातोश्री’बाहेर निदर्शनं केली होती. ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर निदर्शने करणारे मुस्लिम नागरिक हे सुपारी घेऊन आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते समर्थक होते, असा आरोप शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
‘वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक हे सध्या संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं आहे. त्या समितीत सर्व पक्षांचे सदस्य असणार आहे. मात्र काही लोकांनी ‘मातोश्री’ बाहेर येऊन गोंधळ घालत आम्हाला जाब विचारला. निदर्शकांमधील अर्धे लोक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. या लोकांना मातोश्रीबाहेर गोंधळ करण्यासाठी कुणी पाठवलं होतं, ही सुपारी कुणी दिली होती असा सवाल करत हे सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेली माणसे होती, असा थेट आरोप राऊत यांनी केला.
निदर्शने करणाऱ्यांची नावे आणि त्यांचे फोटो राऊत यांनी पत्रकारांना दाखवली. यातील काही लोक ‘वर्षा’वर राहतात तर काही जण ठाण्यातील रहिवासी असल्याचं ते म्हणाले. अकबर सय्यद, सलमान शेख, अब्रार सिद्दिकी, इश्तियाक सिद्दिकी, इलियास शेख, अकरम शेख, ईशान चौधरी या आंदोलनकर्त्यांचे वेगवेगळ्या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काढलेले फोटो राऊत यांनी पत्रकारांना दाखवले.
ठाण्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमापूर्वी गोँधळ घालणारे हे सुद्धा स्थानिक ठाण्याचे नव्हते. तेही ‘सुपारी गँग’चे सदस्य होते, असा आरोप राऊत यांनी केला. ‘सुपारी गॅंग’चा प्रमुख अहमदशाह अब्दाली दिल्लीत बसला असल्याचं राऊत यावेळी म्हणाले. तसेच राज ठाकरे यांच्यावर बीड येथे सुपाऱ्या फेकणारे शिवसैनिक नव्हते, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे.