संजय राऊत यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज – आशिष शेलार

मुंबई – ईडी प्रकरणावरून शिवसेना-भाजप आमनेसामने आले आहेत. शिवसेनेने सामनामधून भाजपाला टोला लगावल्यानंतर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका करत संजय राऊत यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज असल्याचे म्हटले आहे.

“शिवसेना आणि सामनाच्या अग्रलेखातून ज्या प्रकारची भाषा येत आहे, त्यावर काही प्रतिक्रिया देण्याऐवजी किव करावी वाटते. राज्याच्या राजकारणात सुविद्य, सुविचार आणि संस्काराचा कधीच शिवसेनेने ऱ्हास केलाय. आज ते सत्तेत बसल्याचे दुर्दैव महराष्ट्र पाहत आहे.’ असे म्हणत शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

“नोटीस मिळाल्यापासून संजय राऊत जे लिखाण करताहेत त्यावरून त्यांना सल्ला द्यावासा वाटतो की, त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आम्हाला त्यांची चिंता आहे. तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे की काय असेल वाटतेय. महापालिकेनेही प्रभादेवीजवळ एक मानसोपचार तज्ज्ञाचे कार्यालय सुरू करावे”, असेही आशिष शेलार यांनी म्हटलेय.

सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलेय ?

सध्या महाराष्ट्रात ईडी प्रकरण गाजत आहे. महाराष्ट्रातून भाजपाची इडा-पीडा गेल्यानंतर हे ईडी प्रकरण जोर धरू लागले आहे. म्हणजे ईडीचा वापर करून भाजपाविरोधकांना नमवण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. आता ईडीला घाबरून भाजपाच्या कळपात शिरलेल्या एका महात्म्याने ठाकरे सरकार पडण्याचा नवा मुहुर्त सांगितला आहे.

आता म्हणे मार्च महिन्यात काही झाले तरी सरकार पडणार हा मुहुर्त त्यांनी ईडीपिडीच्या पंचांगातून काढला की, त्यांना दृष्टांत झाला, हा प्रश्न आहे. एक मात्र खरे की, महाराष्ट्रातील भाजपावाले सत्तास्थापनेसाठी त्या ईडीवर फारच विसंबून राहिले आहेत.

ईडीची नोटिस आली की, चौकशीसाठी संबंधिताने जायलाच हवे. कायद्याचा सन्मान व्हायलाच पाहिजे. कायदा सगळ्यांसाठी समान. दुसरे म्हणजे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस म्हणतात ते देखील बरोबरच आहे. कर नाही तर डर कशाला? त्यांचे हे सांगणे बरोबरच आहे. पण या नोटिसा देशभरात फक्त भाजपाविरोधकांना का येतात हा प्रश्न आहे.

देशात फक्त भाजपवालेच गंगास्नान करतात आणि बाकीचे लोक गटारस्नान करतात, असे काही आहे काय? शिवसेनेच्या बाबतीत कर नाही तर डर नाही वगैरे ठिकच, पण करून सवरून नामानिराळे राहण्याची आमची अवलाद नाही. जे केले त्याची जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत. त्याचे उदाहरण म्हणजे बाबरी विद्ध्वंस. तेथे रणातून पळून गेले ते कर आणि डरचे दाखले देत आहेत. हा विनोदच म्हणावा लागेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.