Sanjay Raut meets Sonia Gandhi Rahul Gandhi – राजकारणात कधीही काहीही घडू शकतं हे महाराष्ट्राने गेल्या अडीच-तीन वर्षात अनुभवलंच आहे. भाजप शिवसेनेचा २५ वर्षांच्या युतीनंतर काडीमोड, महाविकास आघाडीची स्थापना अन् शिवसेनेत पडलेली उभी फूट यावरून राजकीय पक्षांमध्ये पडलेली छोटीशी ठिणगी देखील पुढे कशी रौद्ररूप धारण करू शकते हे देखील आपण पाहिलं आहे. अशीच ठिणगी महाविकास आघाडीत पडल्याची चर्चा सुरु होती.
राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेलं वक्तव्य आणि उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत त्या वक्तव्याचा घेतलेला समाचार, ही महाविकास आघाडीचा डोलारा कोसळण्याची सुरुवात असल्याची देखील बोलण्यात आलं. मात्र शरद पवार यांनी ही ठिणगी वेळीच विझवण्याचं काम दिल्लीत काँग्रेससोबत झालेल्या बैठकीत केलं. शरद पवार यांच्या शिष्टाईनंतर आता महाविकास आघाडीचे दुसरे शिल्पकार संजय राऊत यांनी देखील महाविकास आघाडीत बिघाडी नको यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे.
संजय राऊत यांनी, सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट असल्याचे ट्विट केले असून महाविकास आघाडीत सारेकाही आलबेल असल्याचं सांगितलं आहे. “श्रीमती सोनिया गांधी आणि श्री राहुल गांधी यांची आज भेट झाली.अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. सर्व काही आलबेल आहे. चिंता नसावी.” असं ट्विट राऊत यांनी केलं आहे.
शिवसेनेचा पारा उतरला?
उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत बोलताना सावरकरांचा अपमान आपल्याला मान्य नसल्याचे जाहीर सांगितले होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचे नाव देखील घेतले होते. शिवसेना आक्रमक झाल्यानंतर शरद पवार यांनी देखील दिल्लीत काँग्रेससोबत झालेल्या बैठकीत सावरकरांचा अपमान नकोच अशी भूमिका मांडली. शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या भूमिकेचा आदर राखत राहुल गांधी देखील याबाबत बोलणे टाळणार असल्याचे म्हणाल्याचे कळते. यामुळे सावरकरांचा मुद्दा मागे टाकून भाजपला कसे तोंड द्यायचे याबाबत तिन्ही पक्षांचा जोर असणार आहे. यामुळे शिवसेनेचा वाढलेला पार देखील उतरल्याचे दिसत आहे.
श्रीमती सोनिया गांधी आणि श्री राहुल गांधी यांची आज भेट झाली.अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
सर्व काही आलबेल आहे. चिंता नसावी.— Sanjay Raut (@rautsanjay61) March 29, 2023
राहुल गांधींचा फोटो गायब…
महाविकास आघाडीची छत्रपती संभाजी नगर येथे होणार असलेल्या सभेच्या बॅनरवरून राहुल गांधी महाविकास आघाडीला नकोसे झालेत काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र याबाबतही तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीला सुरुंग कसा लावायचा, त्यासाठी काय स्ट्रॅटजी आखायची याचाच विचार विरोधक करत असल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडीचे दोन शिलेदार सरसावले
दरम्यान, संजय राऊत यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर महाविकास आघाडीचे दोन प्रमुख शिल्पकार म्हणजेच शरद पवार व संजय राऊत यांनी वेळीच महाविकास आघाडीत पडलेली ठिणगी विझवल्याचे बोलले जात आहे.