मुंबई – प्रसिद्ध लावणी कलावंत गौतमी पाटील हे नाव सध्या राज्यभरात ट्रेंडिंगला आहे. गौतमीच्या लावणीच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होत असते. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाल्याचे देखील पाहायला मिळाले. त्यामुळे गौतमी नेहमीच चर्चेत राहिली आहे. राजकीय वर्तुळात देखील आता गौतमीच्या नावाची चर्चा रंगली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करत त्यांना गौतमी पाटील म्हंटले आहे.
मुंबईत पत्रकार परिषदेत नितेश राणे म्हणाले की, “महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राजाराम राऊत आहेत.गौतमी पाटील वेगवेगळ्या कार्यक्रमात जाऊन लोकांचं मनोरंजन करते, नाचते, लोकांना नाचवते. ती उत्तम कलाकार आहे आणि लोकप्रिय आहे. तिला पाहायला लोकांना आवडते. तसेच या महाविकास आघाडीच्या गौतमी पाटीलला देखील लोकांना त्याला पाहायला आवडते, असे वाटते. पण तो गैरसमज दूर झाला पाहिजे.”
पुढे नितेश राणे म्हणाले की, “मी गौतमी पाटीलने तिचे मेकअपचे काही सामान संजय राऊतांकडे पाठवावे अशी विनंती करतो. गौतमीने राऊतांचं थोबाड थोड चांगले करावे. रोज सकाळी येऊन नशेत असल्यासारखं बोलत असतात. लोकांची सकाळ खराब करतात. संजय राऊत नेमके कुणाच्या बाजूने आहेत हे त्यांनाही माहिती नाही. त्यामुळे सरड्यालाही लाज वाटेल इतक्या वेळा ते रंग बदलत असतात.” अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.