‘संजय राऊत हे गल्लीतल्या कुसक्या म्हाताऱ्यासारखे’

मुंबई: राणे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यातील वैर सर्वज्ञात आहेच. एकमेकांना टीका करण्याची संधी मिळाली तर ती ना शिवसेना सोडते ना राणे कुटुंबीय. पुन्हा एकदा माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ट्वीट करत खोचक टीका केली आहे.

‘काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा करायची आणि दिल्लीत एनडीएची बैठक नाकारायची.. संजय राऊत हे गल्लीतल्या कुसक्या म्हाताऱ्यासारखे आहेत, जे सगळे ठीक असले तरीही सोसायटीच्या वॉचमनशी उगाच हुज्जत घालत बसतात, असा टोला निलेश राणे यांनी ट्विटर वरून लगावला आहे.

दरम्यान, शिवसेनेने भाजप सोबत काडीमोड घेत आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) नसल्याचे भाजप नेत्याकडून जाहीर करण्यात आले आहे. तर या वरून संजय राऊत यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर हल्ला चढवला आहे. आम्हाला एनडीएतून काढणारे तुम्ही कोण असा थेट सवाल सेनेने केला आहे. आम्ही एनडीएत नसल्याची घोषणा कशाच्या आधारावर आणि कुणाच्या परवानगीने केली, असेही विचारणा अग्रलेखातून करण्यात आली आहे.

शिवसेनेची काँग्रेसशी जवळीक वाढली अशी चर्चा भाजपच्या गोटात चालली आहे. पण असे काही होत असेल तर एनडीएने त्यावर बैठक बोलावली पाहिजे. यावर चर्चा करून शिवसेनेवर आरोपपत्र का ठोकले नाही, असा सवालही अग्रलेखात केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.