Sanjay Raut : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत गेल्या काही महिन्यांपासून आजारी असल्याचं समोर आलं होतं. गेल्या वर्षी दिवाळीच्या सुमारास त्यांना गंभीर आजाराचं निदान झाल्याची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियावरून दिली होती. मात्र नेमका कोणता आजार आहे, याबाबत स्पष्ट माहिती नसल्याने त्यांच्या कार्यकर्ते, समर्थक आणि चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहितीही समोर आली होती. रुग्णालयात उपचार, शस्त्रक्रिया आणि चेहऱ्यावर मास्क असलेले फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या आजाराबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र आता स्वतः संजय राऊत यांनी एका मराठी वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आजाराबाबत स्पष्ट खुलासा केला आहे. त्यांनी आपल्याला कॅन्सरचं निदान झाल्याचं मान्य केलं असून, सध्या उपचार सुरू असल्याचं सांगितलं आहे. मुलाखतीदरम्यान राजकारणावर जोरदार भाष्य केल्यानंतर, वैयक्तिक आयुष्यातील लढ्याबाबत प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी थेट आणि स्पष्ट शब्दांत आपली परिस्थिती मांडली. संजय राऊत म्हणाले, “नाही, मला कॅन्सर झाला ना? त्यात काय? दिवाळीच्या दोन-चार दिवस आधी कॅन्सरचं निदान झालं. माझे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी माझं रक्त तपासलं. त्यातून निष्पन्न झालं की मला पोटात कॅन्सर आहे. त्यातून आता मी बाहेर यायचा प्रयत्न करतोय. जेव्हा जेव्हा शक्य झालं, तेव्हा मी बाहेर आलो, उभा राहिलो. अजून काही उपचार सुरू आहेत. काही सर्जरी व्हायच्या आहेत. पण त्या होतील.” या विधानातून संजय राऊत यांनी आजाराशी सुरू असलेली स्वतःची झुंज आणि आत्मविश्वास दोन्ही स्पष्ट केले आहेत. गंभीर आजार असूनही त्यांनी राजकीय आणि सार्वजनिक आयुष्यात सक्रिय राहण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे.