“संजय राऊत चंद्र, सूर्य, मंगळ यासोबत कशावरही भाष्य करु शकतात”; भाजपने उडवली खिल्ली

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविषयी काँग्रेसमधील नाराजी वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी युपीएचं नेतृत्व करण्याबाबत संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी, पाटील यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली.

संजय राऊत यांनी शरद पवार यांनी युपीएचं नेतृत्व करावे, असे वक्तव्य केले होते. यासंदर्भात चंद्रकात पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना मी प्रतिक्रिया देणं बरोबर नाही, असे म्हणत पाटील यांनी संजय राऊतांना टोलाही लगावला.

संजय राऊत हे गेल्या वर्षभरात असे नेते निर्माण झाले आहेत की, संजय राऊत हे चंद्रावर, सूर्यावर, मंगळावर कशाहीवर भाष्य करु शकतात, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. मी सामान्य माणूस आहे, त्यांनी काय म्हटलं यावर मी प्रतिक्रिया देणं बरोबर नाही, असेही ते म्हणाले. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजपा उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी पाटील आले होते, त्यावेळी विविध विषयांवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नांदेडधील हल्लासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना, नांदेडमधील हल्लाचे समर्थन होणार नाही, पोलिसांवरील हल्लाचे तर कधीच नाही, आम्ही सत्तेत असो किंवा नसो. पण, हा असंतोष तेथील नागरिकांमध्ये का निर्माण झाला याचा विचार ठाकरे सरकारने करावा, असेही पाटील यांनी ठाकरे सरकारला सूचवले आहे. स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न हा मोठा विषय आहे, महाराष्ट्रात 70 लाख लोकांना वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यापैकी, लाखो लोक सोलापूर जिल्ह्यातील आणि हजारो शेतकरी या पंढरपूर-माढा मतदारसंघातील आहेत. पाणी असूनही केवळ वीज नसल्यानं येथील शेतकऱ्यांना पाणी वापरता येत नाही, वाढीव वीजबीलाचा हा असंतोष येथील नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच ही निवडणूक चालणार आहे. लोकांच्या मनात असलेला उद्रेक मतांच्या रुपातून बाहेर येईल, आणि आम्ही ही निवडणूक नक्की जिंकू, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलाय.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.