मुंबई – क्रिकेट समालोचक म्हणुन असलेला करार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रद्द केल्याने माजी कसोटीपटू संजय मांजरेकर सध्या लॉकडाऊनचा काळ घरातच व्यतीत करत आहेत. मात्र, लोकांना उपदेशाचे डोस पाजण्याचे कार्य करण्याची त्यांची हौस काय फिटलेली नाही हेच त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरुन सिद्ध होत आहे. घरीच असलेल्या मांजरेकरांनी चक्क गवार चिरतानाचा आपला फोटो पोस्ट करत गवारच नव्हे तर भाज्या कशा चिराव्यात याचेही धडे दिले आहेत.
देशात लॉकडाऊन असल्याचे तसेच करोनाचा धोका असल्याने सर्व प्रकारचे क्रिकेट बंद झाले आहे. त्यातच गेल्याच महिन्यात मंडळाने मांजरेकर यांच्याशी असलेला समालोचनाचा करार रद्द केल्याने तसेही मांजरेकर आता घरातच आहेत. क्रिकेटच्या सामन्यांत आपल्या फटकळ स्वभावाचे दर्शन अनेकदा केल्याने मंडळातील काही पदाधिकारी तसेच भारतीय संघातील खेळाडूही त्यांच्यावर नाराज झाले होते. रवींद्र जडेजावर केलेली टीका असो किंवा सहकारी समालोचक हर्षा भोगलेंचा केलेला अपमान असो मांजरेकर कायमच वादाच्या केंद्रस्थानी राहिलेले आहेत. आता त्यांचा करार संपल्याने करोनाचा धोका निर्माण होण्यापूर्वीच ते घरीच आहेत.
घरातून बाहेरही पडता येत नसल्याने मांजरेकर घर कामातही मदत करत आहेत. खुद्द त्यांनीच भाजी कशी चिरावी हे स्वतः गवारही चिरतानाचा व्डिडीओ व फोटो पोस्ट केला आहे. त्यातही लोकांना ज्ञान वाटण्याचे कार्य अद्यापही कायम असल्याचेही दाखविले आहे. या काळात घरकामात रमलेले दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्विटरवर गवार कशी चिरायची हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.