बिहार आणि राजस्थानमधील भाजपची धुरा नव्या खांद्यांवर

नवी दिल्ली: बिहार आणि राजस्थानमधील भाजपची धुरा नव्या खांद्यांवर सोपवण्यात आली आहे. भाजपने खासदार संजय जयस्वाल यांना बिहारचे तर आमदार सतीश पुनिया यांना राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष बनवले आहे.

भाजपचे बिहारमधील प्रदेशाध्यक्ष म्हणून याआधी नित्यानंद राय कार्यरत होते. त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने पक्षाने त्या राज्यात नेतृत्वबदल केला. कुठलीही वादग्रस्त पार्श्‍वभूमी नसलेले मवाळ नेते अशी ओळख असणाऱ्या जयस्वाल यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आहे. ती नियुक्ती करताना बिहारमध्ये पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक भाजपने डोळ्यांसमोर ठेवल्याचे मानले जात आहे.

बिहारमधील सत्तारूढ मित्रपक्ष असणाऱ्या भाजप आणि जेडीयूमध्ये अनेकदा शाब्दिक चकमकी झडतात. त्यातून त्यांच्यातील संबंध ताणले गेल्याचे चित्र निर्माण होते. त्यामुळे मित्रपक्षाबरोबरील संबंध चांगले ठेवण्याच्या उद्देशातून जयस्वाल यांच्या नियुक्तीकडे पाहिले जात आहे. तर राजस्थानमधील भाजपचे प्रदेशाध्यक्षपद काही महिन्यांपासून रिक्त होते. आधीचे प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांच्या निधनानंतर त्या पदावर कुणाचीच नियुक्ती करण्यात आली नव्हती. आता संघटनात्मक कार्याचा मोठा अनुभव गाठिशी असणाऱ्या पुनिया यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.