मुंबई : बुलढाण्यात शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी तुफान राडा झाला होता. या राड्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी “पुन्हा राडा केल्यास “चून चून के मारे जाएंगे” असा धमकीवजा इशारा गायकवाड यांनी शिवसैनिकांना दिला आहे. ज्या लोकांना प्रेमाची भाषा कळत नाही, त्यांच्यासाठी हीच भाषा वापरणार, असेही गायकवाड म्हणाले आहेत. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे.
शनिवारी बुलढाण्यात शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीचे रूपांतर चक्क हाणामारीत झाले. दरम्यान, या झालेल्या राड्यात पोलिसांनी मध्यस्थी केली नसती तर तेव्हाच हिशोब चुकता केला असता, असेही गायकवाड म्हणाले आहेत. पुन्हा राडा केल्यास आम्ही काय आहोत हे दाखवून देऊ, असा इशारा गायकवाड यांनी स्थानिक शिवसैनिकांना दिला आहे.
बुलढाण्यातील काही शिवसैनिक पातळी सोडून बोलत आहेत. गेली ४० वर्ष शिवसेनेसाठी एकनिष्ठपणे काम केल्यानंतर आम्हाला ‘गद्दार’ म्हणण्याचा त्यांना अधिकार आहे का? असा सवाल गायकवाड यांनी केला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसह इतर नेत्यांनी आजवर अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह शिंदे गटातील आमदारांवर शाब्दिक हल्ला चढवला. मात्र, याला आम्ही कधीच प्रत्यूत्तर दिले नाही, असे गायकवाड म्हणाले आहेत.
दरम्यान, शनिवारी बुलढाणा बाजार समितीत पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या शिवसेनेच्या सत्कार कार्यक्रमात शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला होता.