Sanjay Gaikwad : कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकावल्याच्या प्रकरणात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने संजय गायकवाड यांच्या पोलीस चौकशीला परवानगी दिली असून, यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. प्रशांत आंबी यांनी कोल्हापूर येथील राजारामपुरी पोलीस ठाण्यात संजय गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता. आता न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, प्रशांत आंबी यांनी दावा केला आहे की, त्यांना अजूनही संजय गायकवाड यांच्या समर्थकांकडून धमकीचे फोन येत आहेत. गेल्या महिनाभरात शंभरहून अधिक धमकीचे कॉल आल्याचे त्यांनी सांगितले असून, यासंदर्भात ते पुन्हा पोलिसांकडे तक्रार दाखल करणार आहेत. काही दिवसांपूर्वी संजय गायकवाड यांनी गोविंद पानसरे यांनी सुमारे ३७ वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी भाषेत असल्याचा आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्यांनी प्रशांत आंबी यांना फोन करून शिवीगाळ केल्याचा आणि पुस्तकाची छपाई केल्यास जीवे मारण्याची धमकी फोन करून दिल्याचा आरोप आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात मोठी चर्चा रंगली होती. या फोन संभाषणात संजय गायकवाड यांनी दिवंगत गोविंद पानसरे यांच्याबद्दलही आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणानंतर प्रशांत आंबी यांनी आक्रमक भूमिका घेत बुलढाण्यात संजय गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. नेमकं प्रकरण काय? संजय गायकवाड यांच्या आणि पुस्तकाचे प्रकाशन प्रशांत आंबी यांच्यासोबतची एक अाॅडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये “अरे गोविंद पानसरे हा छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरीत शिवाजी म्हणणारा कोण होता? मला हे पुस्तक वाचायची गरज नाही. तुमच्यासारखे नालायक लोक शिवाजी महाराजांना एकेरी भाषेत बोलतात. तुला माहितीये ना, त्या गोविंद पानसरेचं काय झालं, त्याची अवस्था काय झाली? मी तुलाही घरात घुसून मारेन, तुला चिरडून टाकेन, तुझी जीभ छाटेन”, अशी धमकी संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना दिली असल्याचा आरोप आहे. यानंतर संजय गायकवाड यांच्याविरोधात राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. मोठा वाद निर्माण झाल्यानंतर संजय गायकवाड यांनी या प्रकरणी आपली सविस्तर भूमिका व्हिडिओ शेअर करत मांडली होती. याविषयीची स्पष्टीकरणही त्यांनी दिले होते. हेही वाचा : Top 10 News : शिवसेना आमदार संजय गायकवाडांना मोठा झटका, महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची एन्ट्री आणि क्रिकेटमध्ये लवकरच नवीन ४ नियम येणार?, वाचा टॉप १० बातम्या