संजय दत्तची कन्या त्रिशला आपल्या वडिलांप्रमाणेच नेहमीच सतत चर्चेत राहते. अलीकडेच तिने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही कटू प्रसंग आणि त्यातून आपल्याला काय धडा मिळाला याबाबतच्या भावना शेअर केल्या आहेत. बॉयफ्रेंडच्या मृत्यूच्या अतिशय धक्कादायक आणि मानसिकदृष्ट्या अतिशय कठीण प्रसंगातून आपल्याला जायला लागल्याचे त्रिशलाने सांगितले.
त्याकाळी आपली मानसिक अवस्था अतिशय बिकट होती. मात्र आयुष्यात अशा काही घटना घडव्याच लागतात. त्यानंतर आपल्यात आमूलाग्र परिवर्तन घडून येऊ शकते, असे त्रिशलाने आपल्या लांबलचक पोस्टमध्ये म्हटले आहे. आपल्या आयुष्यात जर कधी असे अवघड प्रसंग आले नसते, तर आपल्यात कधीच परिवर्तन झाले नसते. सकारात्मक वातावरणात राहिल्याने आणि आपल्याबरोबरच्या सहकाऱ्यांकडून खूप चांगली साथ मिळाल्यानेच आपण या प्रसंगातून सहिसलामत बाहेर पडून नव्याने सुरुवात करू शकल्याचेही त्रिशलाने म्हटले आहे.
त्रिशला दत्त बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार अशी मध्यंतरी चर्चा सुरू झाली होती. मात्र स्वतः संजय दत्तने ही शक्यता फेटाळली होती. त्रिशला आता खूप लहान आहे. तिला अजून शिकायचे आहे. त्यानंतरच तिच्या करिअरचा निर्णय घेतला जाईल, असे संजय दत्तने म्हटले होते.