नवी दिल्ली : ब्रिटनस्थित शस्त्रास्त्र दलाल संजय भंडारी याला आज दिल्लीतल्या न्यायालयाने फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले. सक्तवसुली संचलनालयाच्या विनंतीवरून न्यायालयाने भंडारीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले. या आदेशांमुळे ईडीला भंडारीची कोट्यवधींची मालमत्ता जप्त करणे शक्य होणार आहे. भंडारीला ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली असून तेथील न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाची शक्यता फेटाळली आहे. त्यामुळे आता भंडारीला भारतात आणले जाणे शक्य नाही, असे स्पष्ट झाले आहे.
आयकर विभागाने २०१६ मध्ये दिल्लीत छापा टाकल्यानंतर लगेचच भंडारी लंडनला पळून गेला होता. फेब्रुवारी २०१७ मध्ये ईडीने भंडारी आणि इतरांविरुद्ध मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत फौजदारी खटला दाखल केला आहे. २०१५ च्या काळ्या पैशाविरोधी कायद्यांतर्गत त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या आयकर विभागाच्या आरोपपत्राची दखल घेत हा खटला दाखल करण्यात आला आहे.
ईडीने २०२० मध्ये त्याच्याविरुद्ध पहिले आरोपपत्र दाखल केले. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांच्याशी असलेल्या भंडारी यांच्या संबंधांचीही ईडीकडून तपासणी केली जात आहे.