भारतीय हवाईदलाच्या विमान खरेदी प्रकरणात संजय भंडारी अन्य संबंधीतांच्या विरोधात गुन्हे

नवी दिल्ली – भारतीय हवाईदलासाठी 2895 कोटी रूपयांच्या प्रशिक्षक विमान खरेदीत झालेल्या घोटाळा प्रकरणात सीबीआयने शस्त्रास्त्रांचा दलाल संजय भंडारी आणि अन्य संबंधीतांवर गुन्हा दाखल केला आहे. हा व्यवहार सन 2009 साली झाला आहे. या प्रकरणात सीबीआयने भंडारी याच्या कार्यालय आणि घरांवर छापे टाकले आहेत. या विषयातील तपशील सीबीआयकडून अद्याप जाहीर झालेला नाही.

या प्रकरणाची तीन वर्षे चौकशी सुरू होती. त्यात भ्रष्टाचार झाल्याचा प्राथमिक गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर भंडारी आणि त्याच्या साथीदारावर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात हवाईदलाचे अज्ञात अधिकारी, संरक्षण मंत्रालयातील अधिकारी आणि हे विमान बनवणाऱ्या स्वीत्झर्लंड मधील अन्य कर्मचाऱ्यांच्या विरोधातही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

ऑफसेट इंडिया सोल्युशन या कंपनीने हवाईदलातील अधिकारी आणि संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी संगनमताने हा भ्रष्टाचार केल्याचा सीबीआयचा आरोप आहे. संजय भंडारी आणि बिमल सरीन हे दोन जण ऑफसेट इंडिया सोल्युशन या संस्थेचे संचालक आहेत. या व्यवहाराबद्दल स्वीस कंपनीने भंडारी याच्या कंपनीच्या खात्यांवर पैसे ट्रान्स्फर केल्याचे तपासात आढळून आले आहे. त्याच्या दुबईतील खात्यावरही पैसे ट्रान्स्फर करण्यात आल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. 24 मे 2012 रोजी पिलातस या स्वीस कंपनीला भारतीय हवाईदलासाठी विमाने पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.