राजगुरूनगर -खेड पोलीस ठाण्याच्या गेटवर सॅनिटायझर टनेल बसविण्यात आले आहे. करोना विषाणूचा सामना करण्यासाठी पोलीस यंत्रणा सर्वाधिक काम करीत आहेत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेसाठी अखंड सेवा ते देत आहेत सोशल डिस्टन्स राखण्यासाठी आणि बाहेरगावच्या नागरिकांवर करडी नजर ठेवण्यासाठी पोलीस सतत कार्यरत आहेत.
तालुक्यात करोनाचा अद्याप एकही रुग्ण सापडला नाही. यात पोलिसांची भूमिका मोठी आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी व पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांसाठी संसर्ग होऊ नये म्हणून पोलीस उपाधीक्षक गजानन टोम्पे यांच्या योजनेतून पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी खेड पोलीस स्टेशनच्या गेटवर सॅनिटायझर टनेल बसविले आहे.
पोलीस ठाण्यात जाताना आणि येताना संपूर्ण शरीराचे निर्जंतुकीकरण केले जाते. यावेळी पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहायक निरीक्षक निलेश बडाख, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, रफिक मोमीन, आरोग्य विभागाचे अधिकारी गणेश देव्हरकर, महेश घुमटकर, बाळासाहेब सांडभोर यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.