स्वच्छता मोहीम : ऐतिहासिक तलावाच्या सौंदर्यात भर
कार्ला – ज्या ठिकाणी स्वच्छता असते तेथे आरोग्य नांदत असते. आरोग्य चांगले राहिले तर समाज निरोगी राहू शकतो. त्यामुळे कार्ला येथील तरुणांनी लॉकडाऊनच्या काळातदेखील एक आनोखा उपक्रम घडून आणला. नियमांचे पालन करत ऐतिहासिक तलावाचा परिसरात तरुणांनी स्वच्छता मोहीम राबवली. लॉकडाऊनचे नियम पाळत समाजोपयोगी काम व्हावे या उद्देशाने आठ दिवसांपासून कार्ला येथील तरुणांच्या पुढाकारातून तलाव परिसर स्वच्छ करण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेत दररोज सात ते आठ तरुण सहभागी होऊन फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत परिसरातील गवत, निरोपयोगी झाडे, बाबळा यांची साफसफाई करून परिसर स्वच्छ केला. तलावाच्या कडेला अनेक आंबा, जांभूळ याची झाडे आहेत परंतु अनावश्यक झाडाझुडपाने ही झाडे वेढली होती, अशी झाडेझुडपे काढून टाकण्यात आली. तळ्याकाठी पाण्यात अनावश्यक बेशर्म झाडाची मोठी वाढ फोफावली होती ते सर्व काढून टाकल्याने पाणी स्वच्छ होणार आहे. ऐतिहासिक तळ्याकाठचा परिसर स्वच्छ झाल्याने तळ्याच्या सौंदर्यात भर पडली आहे.
आठ दिवस चाललेल्या या स्वच्छता मोहिमेत माजी ग्रामपंचयात सदस्य भाऊसाहेब हुलावळे, कार्ला उपसरपंच अविनाश हुलावळे, अमोल वायकर, सतीश मोरे, रोहिदास शिर्के, विशाल हुलावळे, सागर हुलावळे, राजू कुंभार, अतिश हुलावळे, सुनील सावळे, संदीप दळवी, अनवर शेख, सनी हुलावळे, दिलीप हुलावळे, संजय हुलावळे, विशाल हुलावळे, गणेश मोरे, विजय मोरे, सुनील केदारी, संदेश हजारे, सचिन शिंदे, गणेश हुलावळे, शंकर शिर्के, कैलास हुलावळे, शब्बीर मणियार, अक्षय हुलावळे, बाळू हुलावळे, ओम मोरे, शिवम मोरे इत्यादी तरुण कार्यकर्ते सहभागी झाले होते.