पुणे – भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा जागतिक टेनिसवर वर्चस्व गाजवले. मात्र, या हरहुन्नरी खेळाडूची कारकीर्द पुण्यातील एका स्पर्धेने सुरू झाली व त्यातूनच तिची प्रतिभा देशपातळीवर नावजली गेली.
महिलांच्या आटीएफ 10 हजार डॉलर रकमेच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सानिया पुण्यात 2001 साली दाखल झाली तेव्हा ही चुमुरडी मुलगी टेनिसपटू आहे यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. मात्र, सानियाने फोरहॅंड व बॅकहॅंडवरील आपली गुणवत्ता सिद्ध करत ही स्पर्धा गाजवली. तिच्यापेक्षा ताडमाड उंच असलेल्या उझबेकिस्तानच्या अक्युल अमानमुरादोवाने सानियाचा पराभव करत तेव्हा ही स्पर्धा जिंकली.
मात्र, त्यानंतर काही वर्षांनी मुरादोवा आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये फारसे यश मिळवू शकली नाही, पण सानियाने मात्र आपली ओळख निर्माण केली आणी तिच्याच खेळातून प्रेरणा घेत भारतात महिला टेनिसपटूंची नवी पिढी तयार झाली. मुंबईत जन्मलेली सानिया हैदराबादला गेली व तिचेच वडील इम्रान मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली नावारूपाला आली. तिच्या कीरकिर्दीचा चढता आलेख सगळ्यांनीच पाहिला आहे.
मात्र, भारताच्या या टेनिस सम्राज्ञीचा पुण्याच्या डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवरून सुरू झालेला प्रवास आंतरराष्ट्रीय क्षितिजावर पाहोचला यातूनच सानियाच्या प्रगतीत पुण्याचाही वाटा होता असे म्हणायला हरकत नाही.
विम्बल्डनचे स्वप्न तेव्हाच पाहिले होते
सनियाने त्यावेळी बोलताना पुढील काळात विम्बल्डन ज्युनिअर गटात सहभागी होत सरस कामगिरी करणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला होता. तसेच त्यानंतर मुख्य विम्बल्डन तसेच विविध ग्रॅंडस्लॅम स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करण्याचे स्वप्न असल्याचेही सांगितले होते.
अमेरिकेची सेरेना विल्यम्स, मार्टिना हिंगिस, मारिया शारापोवा या खेळाडू आपल्या आदर्श असल्याचे सांगणारी सानिया भविष्यात याच खेळाडूंसह तसेच त्यांच्याविरुद्धही खेळली हेच तिच्या वाटचालीचे वैशिष्ट्य ठरले.