सांगवी-दापोडी लढत; माई विरुद्ध माई

 दोन्हीकडून विजयाचे दावे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर पदाच्या शुक्रवारी (दि. 22) होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपकडून उषा (माई) ढोरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून स्वाती (माई) काटे असा संघर्ष रंगणार असल्याचे चित्र आज स्पष्ट झाले. भाजपच्या माई ढोरे या सांगवीतून तर माई काटे सांगवीच्या शेजारील दापोडीमधून लोकप्रतिनिधित्व करतात. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस दोन्ही बाजूने विजयाचे दावे केले जात आहेत.

पिंपरीचे महापौर पद सर्वसाधारण संवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे. या पदासाठी भाजपमध्ये 21 नगरसेविकांतून माई ढोरे यांना आज संधी देण्यात आली. भाजपला प्रतिआव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने महापौर पदासाठी आज माई काटे यांचा अर्ज दाखल केला. तसेच, निवडणूक लढविण्याचा निर्धारही केला आहे. त्यामुळे आता शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीत माई विरूद्ध माई असा संघर्ष पाहण्यास मिळणार आहे. भाजपच्या जुनी सांगवी येथील नगरसेविका माई ढोरे या प्रभाग क्रमांक 32 मधून निवडून आलेल्या आहेत. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दापोडी येथील नगरसेविका माई काटे या प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आलेल्या आहेत.

भाजपच्या माई ढोरे यांना कॉंग्रेसकडून 1995-96 मध्ये उपमहापौर पद मिळाले होते. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून 2006-07 मध्ये स्थायी समिती अध्यक्ष पद मिळाले. तर, आता भाजपकडून महापौर पदासाठी त्यांचे नाव निश्‍चित झाले आहे. राष्ट्रवादीच्या माई काटे या दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्या यापूर्वी 2002 मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.

पक्षाने एक ज्येष्ठ महिला नगरसेविका म्हणून मला महापौर पदासाठी संधी दिली आहे. भाजपची केंद्र, राज्यस्तरावर भक्कम साखळी आहे. ती कधीही न तुटणारी आहे. पक्षाची भरभराट कशी होईल, यासाठी माझा काम करण्यावर भर राहणार आहे. राष्ट्रवादीचा महापालिकेत पुर्नजन्म होऊ देणार नाही. पाणी प्रश्‍न सोडविण्यास यापुढील काळात प्राधान्याने भर देणार आहे.
– माई ढोरे, भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार


राज्यात सत्ता स्थापनेसाठी सध्या ज्या घडामोडी होत आहेत, ते पाहता पिंपरी-चिंचवड महापालिकेत देखील बदल होण्याची शक्‍यता आहे. पक्षाने दिलेल्या आदेशानुसारच मी आज महापौर पदासाठी अर्ज भरला. भाजपचे बरेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत.
– माई काटे, राष्ट्रवादीच्या महापौर पदाच्या उमेदवार

Leave A Reply

Your email address will not be published.