नवी दिल्ली: भारताचा प्रसिद्ध मुष्टियोद्धा सुमित सांगवान उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यामुळे मला धक्का बसल्याचे भारताचे राष्ट्रीय मुष्टियुद्ध प्रशिक्षक सी. ए. कुटप्पा यांनी सांगितले आहे. संगवानची आजवरची कारकीर्द एकदम स्वच्छ होती. तो अत्यंत मेहनती व प्रामाणिक खेळाडू आहे, त्यामुळे मला वाटते केवळ अज्ञानातून त्याच्याकडून ही चूक झाली आसावी, असेही कुटप्पा म्हणाले.
सांगवानने ऑक्टोबरमध्ये 91 किलो वजनी गटात राष्ट्रीय विजेतेपद पटकाविले. त्यानंतर 81 किलो वजनी गटातून खेळण्यासाठी तो तयारी करत होता. मात्र, अचानक ही बातमी आल्याने खळबळ उडाली. त्याच्या कारकिर्दीत असे यापूर्वी कधी घडलेले नाही. तो खूपच कमनशिबी आहे. 2017 मध्ये त्याने आशियाई रजतपदक जिंकले.
नंतर त्याला दुखापत झाली. त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. तो पुन्हा सावरत होता. त्यातच ही चूक झालेली आहे. काही दिवसांपूर्वी नीरज फोगाट हिचे नाव उत्तेजक चाचणीत आल्यानंतर धक्का बसला. आजवर भारतीय मुष्टियुद्धपटू अशा गोष्टीत दोषी आढळलेले नाहीत. त्यामुळे ही घटना आमच्यासाठी धक्कादायक आहे, असेही कुटप्पा म्हणाले.