सांगवीतील प्रकरण : ‘त्या’ गोळीबारामागे “लव्ह ट्रॅंगल’

पिंपरी – सांगवी येथे 9 जानेवारी रोजी गोळीबाराची घटना घडली होती. या गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्यात सांगवी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून ही घटना घडल्याचे पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

जसप्रीतसिंग अमरजीतसिंग सत्याल (वय 30, रा. औरंगाबाद), आनंद ऊर्फ दादुस मोहन इंगळे (वय 27, रा. उल्हासनगर) आणि सुनील हिवाळे (रा. औरंगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आनंद सोळंकी (रा. जुनी सांगवी) या तरुणावर गोळीबार करण्यात आला होता.

पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद यांच्या पत्नीचे लग्नापूर्वी आरोपी जसप्रितसिंग प्रेमसंबंध होते. मात्र जसप्रीतसिंग हा विवाहित असून त्यांचा धर्म वेगळा असल्याने ते लग्न करू शकत नव्हते. यामुळे त्याच्या प्रेयसीने आनंद यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यास जसप्रीतसिंग याने परवानगी दिली. तसेच प्रेमप्रकरणाबाबत आनंद यांनाही सांगितले होते.

लग्नापूर्वी आनंद यांना धमक्‍या देण्यात आल्या. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. लग्न करून पुण्याला येत असताना एका हॉटेलवर थांबले असता काही जणांनी त्यांना भेटून आम्ही तुमचा पाठलाग करीत असल्याचे सांगत जपून जाण्याचा सल्ला दिला. दिवाळीच्या सणावरून परत पुण्याला येत असतानाही त्यांचा 60 किलोमीटर पाठलाग झाला होता. आनंद यांच्या पत्नीने दोन मोबाइल क्रमांक बदलले. मात्र तरीही जसप्रीतसिंग हा पत्नीच्या भावाच्या मदतीने तिच्या संपर्कात होता.

आरोपी हिवाळे याने रावळकर नावाच्या व्यक्‍तीचा फोन घेऊन आनंद यांना धमकी दिली होती. पोलिसांनी रावळकर यांना साक्षीदार केले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास अद्याप बाकी असून आणखी काही धक्‍कादायक माहिती समोर येण्याची शक्‍यता असल्याचेही आयुक्‍त म्हणाले.

पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्‍त रामनाथ पोकळे, उपायुक्‍त आनंद भोईटे, सहायक आयुक्‍त गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखली वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले, सहायक निरीक्षक सतीश कांबळे, उपनिरीक्षक यशवंत साळुंके, कर्मचारी चंद्रकांत भिसे, कैलास केंगले, सुरेश भोजणे, राहिदास बोऱ्हाडे, अरुण नरळे, प्रवीण पाटील, नितीन खोपकर, शशिकांत देवकांत, विजय मोरे, अनिल देवकर, हेमंतकुमार गुत्तीकोंडा, शिमोन चांदेकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

पाच लाखांची सुपारी
आरोपी जसप्रितसिंग याने आनंद यांचा खून करण्यासाठी पाच लाखांची सुपारी आरोपी इंगळे याला दिली. यापैकी साडेचार लाखांची रोकडही इंगळे याला दिली. या पैशातून त्याने मध्य प्रदेशातून पिस्तुल खरेदी केले. गेली 15 दिवस इंगळे हा दुचाकीवरून सांगवीमध्ये येऊन रेकी करीत होता. त्याने पूर्वीही देखील आनंद यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. इंगळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.