पुणे – सांगली महापालिकेत घडलेल्या राजकीय घडामोडींचा धसका घेत, भाजपने स्थायी समितीच्या निवडणुकीसाठी पुण्यात सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे. स्थायी समिती अध्यक्षपदावरून समिती सदस्यांमध्ये धूसफूस सुरू असल्याने निवडणुकीत दगाफटका होऊ नये, यासाठी समितीच्या सर्व सदस्यांना व्हिप बजावण्यात आला आहे.
स्थायी समिती अध्यक्ष निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज भरण्यात येणार आहे. त्यामुळे पक्षाकडून याबाबत खबरदारी घेण्यात आली आहे. सांगलीच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत भाजपचे नगरसेवक फोडत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने भाजपला धक्का दिला. आता दि. 5 मार्चला पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आणि शिक्षण समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. वास्तविक पाहता 16 सदस्य असलेल्या स्थायी समितीत भाजपचे 10 सदस्य असून पक्षाचे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ औपचारिकता ठरणार आहे.
मात्र, त्याचवेळी पक्षात स्थायी समिती अध्यक्षपदावरून नाराजीचा सूर आहे. विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना पुन्हा समिती अध्यक्षपदी नेमण्याचा निर्णय जवळपास घेतला असून त्यासाठी त्यांची समितीत फेरनियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षात काही नाराजांकडून धुसफूस सुरू असून थेट नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्थायीच्या निवडणुकीत सांगली पॅटर्न तर राष्ट्रवादीकडून राबवला जाणार नाही, ना याची भीती निर्माण झाली आहे.
स्थायी समितीच्या 16 सदस्यांमध्ये सत्ताधारी भाजपचे दहा तर महाविकास आघाडीचे 6 असे संख्याबळ आहे. भाजपकडून अध्यक्षपद खेचून आणायचे असेल तर महाविकास आघाडीला तीन सदस्यांची गरज भासणार असून त्यासाठी नाराजांना गळाला लावल्यास महाविकास आघाडीला फायदा होणार आहे. मात्र, हे सर्व अंदाज असले तरी खबरदारी म्हणून भाजपकडून व्हीप बजावण्यात आला आहे.