सांगली – सांगली जिल्ह्यातील विटामध्ये रेशनधान्याचा घोटाळा उघडकीस आणला आहे. मनसेचे खानापूर तालुका अध्यक्ष साजिद आगा यांनी हा रेशनधान्याचा घोटाळा उघडकीस आणला. पुरवठा विभागाने एका पोल्ट्रीच्या गोडाऊनमध्ये टाकलेल्या छाप्यात तांदळाची 221 पोती, तर गव्हाची 98 पोती असे एकूण असे एकूण 319 पोती धान्य जप्त केले आहे. छाप्यात सापडलेल्या या धान्याचा पंचनामा करण्यात आला आहे.
खानापूर तालुक्यातील गोरगरिबांच्या हक्काचे धान्य विटा येथील कराड रोडवर गोकुळ मंगल कार्यालयाजवळ असलेल्या एका पोल्ट्रीमध्ये असल्याची माहिती साजिद आगा व कृष्णा देशमुख यांना मिळाली होती. त्यानुसार मनसेचे तालुकाध्यक्ष साजिद आगा यांनी नायब तहसीलदार व धान्य पुरवठा अधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.
नायब तहसीलदार व अन्नपुरवठा अधिकारी व पोलीस यांच्या पथकाने आज दुपारी कराड रोडवर गोकुळ मंगल कार्यालयाजवळ असलेल्या संबंधित पोल्ट्रीचे गोडाऊन उघडले. त्या गोडाऊनमध्ये तांदळाची 221 पोती व गव्हाची 98 पोती असे एकूण असे एकूण 319 पोती धान्य सापडले.
संबंधित गोडाऊन मालक तुकाराम भाऊ गायकवाड यांनी हे गोडाऊन रामभाऊ आनंदराव सपकाळ यांना भाड्याने चालवायला दिले आहे असे समजते. रामभाऊ सपकाळ यांनी या धान्याबाबत कोणतीही कागदपत्र सादर केलेली नाही.
त्यामुळे सदरचा धान्यसाठा अवैध असून काळा बाजार विक्रीच्यादृष्टीने आणल्याचे दिसून आल्याने गोडाऊन सील करत पुरवठा निरीक्षक यांच्यामार्फत पुढील कार्यवाही सुरू केली असल्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी सांगितले.