सांगली : सांगलीमधून पती – पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने कॉलेजला जाणाऱ्या आपल्या पत्नीवर कोयत्याने हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून जवळच्या शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
प्रांजल काळे असे हल्ला करण्यात आलेल्या पीडित महिलेचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी प्रांजलचा संग्राम शिंदे याच्याशी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी या दोघ्यांमध्ये वाद सुरु झाला. हा वाद एवढा वाढला कि दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. मात्र आज सकाळी प्रांजल कॉलेजला जात असताना संग्रामने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला.
या हल्ल्यात प्रांजलच्या हाताला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी पतीविरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सांगलीमध्ये कॉलेज कॉर्नर भागात घडली आहे. आरोपी संग्रामने पत्नीवर हल्ला का केला, याबाबतची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.