मुंबई – मराठी वाहिन्यांच्या गर्दीत आपला दर्जा आणि कार्यक्रमांचे पावित्र्य टिकवलेल्या दूरदर्शनच्या “सह्याद्री वाहिनीतर्फे गाजलेल्या 6 संगीत नाटकांची मेजवानी देण्यात येणार आहे. दिनांक 26 फेब्रुवारी 2021 पासून नाट्यमहोत्सव सादर करणार आहे.
यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित “अनादी मी अनंत मी’ या कार्यक्रमाने या संगीत नाटक महोत्सवाची सुरुवात होईल. त्यानंतर गोविंद बल्लाळ देवल लिखित “संगीत शारदा’, राम गणेश गडकरी लिखित “संगीत एकच प्याला’ (28 फेब्रुवारी), विद्याधर गोखले लिखित “संगीत सुवर्ण तुला’ आणि “संगीत जय जय गौरीशंकर’, भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेरकर लिखित “संगीत हाच मुलाचा बाप’, नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित “संगीत स्वयंवर’ अशा जुन्या नाटकांचा समावेश आहे. मराठी मनावर गारूड करणारी आणि भारतीय संगीत परंपरेचा एक अविभाज्य भाग असलेली ही गाजलेली नाटके नवीन नटसंचात दाखविली जाणार आहेत. तसेच प्रत्येक नाटकाचे पुनःप्रसारणही केले जाणार आहे. तरी नाट्यरसिकांनी आपल्या सोयीनुसार या नाटकांचा आनंद घ्यावा, असे आवाहन “सह्याद्री’ वाहिनीच्या कार्यक्रम निर्माण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्वा. सावरकर पुण्यस्मृतिनिमित्ताने, स्वा. सावरकर जीवनदर्शन घडवणारी, महाराष्ट्र शासनातर्फे मराठी साहित्यातील उत्कृष्ट वाड्मयनिर्मिती पारितोषिक (1990) विजेती, एक अजरामर दृक्श्राव्य नाट्यकलाकृती “अनादी मी, अनंत मी’ याच नावाने प्रथमच दूरदर्शनवर सादर होणार आहे. या कलाकृतीचे लेखक/दिग्दर्शक माधव खाडिलकर असून संगीत आशा खाडिलकर यांनी दिले आहे. या संपूर्ण नाट्यमहोत्सवाचे प्रसारण शुक्रवार, दि. 26 फेब्रुवारी पासून दररोज दुपारी 2.30 आणि सायंकाळी 7.30 या वेळेत होणार आहे.
असे आहे वेळापत्रक…
क्र. नाटकाचे नाव, प्रक्षेपण दिनांक आणि वेळ, पुनर्प्रक्षेपण
1. अनादी मी अनंत मी – शुक्रवार, 26 फेब्रुवारी – दुपारी 2.30 आणि सायंकाळी 7.30
2. संगीत सुवर्णतुला – शनिवार, 27 फेब्रुवारी – दुपारी 1.30, रात्री 10.30; सोमवार, 1 मार्च – पहाटे 1.30
3. संगीत जय जय गौरीशंकर – शनिवार, 6 मार्च – दुपारी 1.30, रात्री 10.30; सोमवार, 8 मार्च पहाटे 1.30, गुरुवार, 11 मार्च – सायंकाळी 7.30
4. संगीत हाच मुलाचा बाप – शुक्रवार, 12 मार्च – सायंकाळी 7.30, शनिवार, 13 मार्च – दुपारी 1.30, रात्री 10.30, सोमवार, 15 मार्च – पहाटे 1.30
5. संगीत शारदा – शुक्रवार, 19 मार्च – सायंकाळी 7.30, शनिवार, 20 मार्च – दुपारी 1.30, रात्री 10.30, सोमवार, 22 मार्च – पहाटे 1.30
6. संगीत स्वयंवर – शुक्रवार, 26 मार्च – सायंकाळी 7.30, शनिवार, 27 मार्च – दुपारी 1.30, रात्री 10.30, सोमवार, 29 मार्च – पहाटे 1.30
7. संगीत एकच प्याला – शुक्रवार, 2 एप्रिल – सायंकाळी 7.30, शनिवार, 3 एप्रिल – दुपारी 1.30, रात्री 10.30, सोमवार, 5 एप्रिल – पहाटे 1.30