Sangharsh Yoddha Movie । Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेला संघर्ष आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मनोज जरांगे यांच्यावर आधारित ‘संघर्षयोद्धा’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीजर देखील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला असून, टीझरला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे.
दरम्यान, अश्यातच या सिनेमाबद्दल एक मोठी बातमी समोर आली असून या चित्रपटाचा आणखी एक नवाकोरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला छगन भुजबळ आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची देखील झलक पाहायला मिळणार आहे. ‘संघर्षयोद्धा -मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट उद्या म्हणजेच, 14 जूनला प्रदर्शित होत आहे. त्यापूर्वीच सिनेमाचा आणखी एक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
पण या चित्रपटात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या भूमिका कोण करणार? याची कमालीची उत्सुकता अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना लागून राहिली होती. मात्र, सिनेमाचा दुसरा ट्रेलर लॉन्च झाल्यावर यावरून देखील पडदा उघडण्यात आला आहे. छगन भुजबळ यांची भूमिका अभिनेते संजय कुलकर्णी, तर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका शिवाजी दोलताडे यांनी साकारली आहे.
अख्खा महाराष्ट्र या चित्रपटाच्या टीमने प्रमोशनसाठी पिंजून काढला असून रसिक प्रेक्षकांकडूनही या ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर देखील नेटकरी कौतूक करताना दिसत आहेत. या चित्रपटाचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी याठिकाणी करण्यात आले आहे.
तसेच चित्रपटातील बराचसा भाग खऱ्याखुऱ्या आंदोलनादरम्यान शूट करण्यात आल्याचे टीजरवरून समजते. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलं आहे. तर चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे.
यासह अभिनेते संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके अशा दमदार अभिनेत्यांची फौज या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.