Sangharsh Yoddha Movie । Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेला संघर्ष आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मनोज जरांगे यांच्यावर आधारित ‘संघर्षयोद्धा’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीजर देखील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला असून, टीझरला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे.
संघर्षाची धगधगती मशाल हाती घेऊन मराठ्यांच्या नेतृत्वासाठी झंझावात बनून तेवत राहणाऱ्या नेतृत्वाच्या संघर्षाची गाथा.. अशा कॅप्शनखाली चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याविषयी प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे.
दरम्यान, अश्यातच या सिनेमाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. हा चित्रपट २६ एप्रिल २०२४ ला हा महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार होता, मात्र आता सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. सेन्सॉर बोर्डने प्रदर्शनासाठी काही वेळेसाठी थांबवला आहे, असं चित्रपटाचे लेखक, निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सांगितलं आहे.
हा चित्रपट प्रदर्शनापासून थांबवल्यामुळे राज्यभर तीव्र निषेध होतोय. हा चित्रपट आता येत्या २१ जून २०२४ ला संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण ताकदीने प्रदर्शित होईल, असं सिनेमाचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता या चित्रपटासाठी प्रेक्षकांना आणखी थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे.
या चित्रपटाचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी याठिकाणी करण्यात आले आहे. तसेच चित्रपटातील बराचसा भाग खऱ्याखुऱ्या आंदोलनादरम्यान शूट करण्यात आल्याचे टीजरवरून समजते. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलं आहे.
तर चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. तर मनोज जरांगे यांच्या वडिलांची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांनी साकारली आहे.
यासह अभिनेते संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके अशा दमदार अभिनेत्यांची फौज या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. | Sangharsh Yoddha Movie । Manoj Jarange Patil