संगमनेर : थोरात साखर कारखान्याच्या वतीने अद्यावत कोविड सेंटर सुरु

अमृत उद्योग समूहातील संस्थांचा पुढाकार

संगमनेर (प्रतिनिधी) : संगमनेर तालुका व शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना करण्यात येत असून तपासणी झालेल्या नागरिकांना चांगल्या व तातडीने सुविधा मिळाव्यात यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह. साखर कारखान्याच्या वतीने वसंत लॉन्स येथे 300 बेडसह अद्यावत कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे.

वसंत लॉन्स येथे 300 अद्यावत बेडचे कोविड कोअर सेंटरची पाहणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केली.यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे,कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ,इंद्रजित थोरात, उपाध्यक्ष संतोष हासे, लक्ष्मणराव कुटे, संचालक रोहीदास पवार,दादासाहेब कुटे,गोरख कुटे, प्रांताधिकारी शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, बीडीओ सुरेश शिंदे,नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश घोलप, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे आदि उपस्थित होते.

संगमनेर शहर व तालुक्यात शासकीय व खाजगी तपासणी मोठया प्रमाणात सुरु आहे. एक रुग्णाबरोबर वीस इतर नागरिकांचे स्वॅब तपासली जात आहे. त्यामुळे संशयीत व सौम्य लक्षणे असणारे नागरिकांची संख्या वाढत आहेत. या नागरिकांची संस्थात्मक विलीगीकरणात चांगली व्यवस्था व्हावी यासाठी प्रशासनाच्या मदतीला महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली अमृत उद्योग समूहाने पुढाकार घेतला असून यातून विविध सहकारी संस्थांनी वेगवेगळया ठिकाणी कोविड सेंटर करण्याचे नियोजन केले आहे. तर युवक काँग्रेस व एनएसयुआय, जयहिंद युवा मंच व राजवर्धन फाऊंडेशनकडून जेवणाचे डबे पुरविले जात आहे. वसंत लॉन्स येथे कारखान्याच्या वतीने 300 सुसज बेड,फॅन,गादी,बेडशिट,जेवणाची व्यवस्था,स्वच्छ जागा, औषधौपचाराच्या सर्व सुविधा पुरविल्या जाणार आहेत.यामध्ये 200 बेड हे पुरुषांसाठी तर स्वतंत्र कक्षात महिलांसाठी 100 बेड राखीव ठेवण्यात आले आहे.

याप्रसंगी नामदार थोरात म्हणाले कि, कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागात होतो आहे.हे चिंताजनक आहे. परंतू प्रत्येकाने शासनाचे नियम पाळले तर कोरोना आपण रोखू शकतो.तालुक्यातील संकटाच्या वेळी अमृत उद्योग समूह कायम मदतीसाठी उभा राहिला असून कारखान्याच्यावतीने केलेली प्रशस्त 300 बेडची अद्यावत सुविधा अत्यंत चांगली आहे. कोरोना संकटाशी आपण सर्वजण मिळून सामना करु या, नागरिकांनी घाबरुन न जाता गर्दी व समारंभ टाळावेत, मास्कचा वापर करावा,  सोशल डिस्टन्सचे पालन करावे असेही ते यावेळी म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.