संगमनेर – संगमनेरमध्ये करोनाचा आलेख वाढतच असून, आज सात रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यातील करोनाबाधितांचा आकडा 39 वर गेला असून, आज तब्बल सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने संपूर्ण तालुका हादरला असून, प्रशासनही गोंधळलेले आहे. संगमनेरमध्ये सलग पाचव्या दिवशी करोनाचे रुग्ण सापडले असून, शहर पोलीस ठाणे, तहसील कचेरी आणि न्यायालयाच्या परिसरात असलेल्या मोमीनपुरा भागात शनिवारी (दि.30) पहाटेच करोनाबाधित रुग्ण आढळला.
याचबरोबर भारतनगरमध्ये देखील आणखी दोन रुग्ण आणि दुपारी तालुक्यातील निमोण येथील 75 वर्षीय इसमास करोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर सिन्नर तालुक्यात असलेल्या कनकुरी येथील 55 वर्षीय इसमाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे संगमनेरातील रुग्ण संख्येत साते वाढ झाली आहे.
भारतनगर, रहेमतनगर, नाईकवाडपुरा, इस्लामपुरा, कुरणरोड, मदिनानगर या शहरातील भागांबरोबरच करोनाने आता शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या मोमीनपुरा या भागात प्रवेश केला आहे. शनिवार
पहाटेच संगमनेर शहरात आणखी दोन करोनाबाधित रुग्ण आढळल्याचे वृत्त शहरात पसरले आणि सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. मोमीनपुरा भागात राहणाऱ्या 71 वर्षीय वृद्धाला करोनाची लागण झाली.
हा वृद्ध कुणाच्या संपर्कात आला, याचा प्रशासन शोध घेत आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कातील हायरिस्कमध्ये असणाऱ्या व्यक्तींना तपासणीसाठी ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. या व्यक्तीसोबतच भारतनगरमधील 33 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच मदिनानगरमध्ये बाधित आढळलेला असून आज संगमनेरमध्ये सात रुग्ण आढळल्याने तालुका हादरला आहे. यातील एक जण सिन्नर तालुक्यातील असून, त्याने संगमनेर येथे येवून तपासणी केली आहे. मात्र त्याचा अहवाल संगमनेरात प्राप्त झाल्याने संगमनेरच्या संख्येत एकने वाढ झाली असून, आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या 37 वर गेली आहे.