बालुचारी साडी

दुर्गादास ऊर्फ दुबराज यांच्या निधनानंतर बालुचारी साडी विणण्याची परंपरा जवळपास मृतवतच झाली होती. नव्या साड्या तयार होणं बंद झालं होतं. काही लोकांकडे त्यांच्या आईच्या, आजीच्या किंवा घरातल्या जुन्या जाणत्या बायकांच्या बालुचारी साड्या कुणाकुणाकडे शिल्लक राहिल्या होत्या.आता बालुचारी साड्या विणणारं पश्‍चिम बंगालमध्ये कुणीही राहिलं नव्हतं, पण त्याचवेळी बनारसी साड्या विणणारे कुशल कारागीर बालुचारी साडीचा अभ्यास करून ती साडी पुन्हा तयार करतील आणि या कलेला पुनरुज्जीवित करतील अशी एक आशा होती.

इंदिरा गांधींची जवळची मैत्रीण असलेल्या पुपुल जयकर आणि कमलादेवी चटोपाध्याय या दोघींना भारतातल्या हस्तकलांबद्दल फार कळकळ होती आणि या दोघींनी या कला जिवंत ठेवण्यासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे. तेव्हा या दोघी 1955-56 मध्ये गुजरातमधल्या बनारसी साडी तयार करणाऱ्या अली अझन आणि इतर विणकरांकडे गेल्या आणि त्यांना बालुचारी साडीचे आधी कुणाकुणाकडे असलेले काही नमुने अभ्यास करण्यासाठी दिले आणि त्यांना तशाच प्रकारच्या साड्या तयार करायला सांगितलं. त्यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करायला सांगितली आणि अनेक कलाकारांना ही कला शिकवायलाही सांगितली. त्याप्रमाणे या विणकरांनी तशाप्रकारच्या साड्या तयार करायला सुरुवात केली. आता अली अझन यांची चौथी पिढी या साड्या तयार करते. त्यांनी या बालुचारी साडीच्या शंभर-सव्वाशे डिझाईन्स तयार केल्या आणि आता याच डिझाईन्स प्रचलित आहेत. तरीही एका हॅन्डलूमवर एका महिन्यात एकच साडी तयार होते. या बालुचारी साड्यांमध्ये सुरुवातीला जरीच्या धाग्यात विणकाम केलं जात असावं, पण आता मात्र हे विणकाम वेगवेगळ्या रंगांच्या रेशमी धाग्यांत केलं जातं.

बालुचारीसारखीच पण वेगवेगळ्या प्रकारची जर वापरून विशेषत: सोन्याची जर वापरून विणकाम केलेल्या साड्यांना स्वर्णाचारी साड्या म्हणतात. या साड्यांचं वेगळेपण म्हणजे सोन्या, चांदीप्रमाणेच यांच्यात तांब्याची तार वापरूनही विणकाम केलेलं असतं.  याशिवाय पश्‍चिम बंगालमध्ये सुती कमी वजनाची तंत साडी, लाल आणि पांढरी लालपर म्हणजेच गरड साडी, कोरियल साडी, टसर साडी आणि कांथा साडी असे साड्यांचे अनेक प्रकार आहेत. त्यातली कांथा साडी तर कांथा म्हणजे गोधडी सारखी असते. घरातली कामं झाल्यावर पूर्वी बायकांना दुपारी वेळ झाला की त्या वेगवेगळ्या कपड्याचे चांगले भाग एकापुढे एक जोडून गोधडी शिवायच्या. त्यावर भरतकाम करून वेगवेगळ्या प्रकारची नक्षी विणायच्या. त्यावर त्या आपल्या आयुष्यातली स्वप्नं, सुख-दुःख चित्रीत करायच्या. तशाच प्रकारे अनेक साड्यांवरही त्या असं भरतकाम करायच्या यावरून अशाप्रकारच्या साडीला कांथा साडी हे नाव पडले. अशा प्रकारे आपल्याच कल्पना आणि सुख-दु:ख विणलेली साडी प्रत्येकीला प्रिय असते. बंगाली साडीबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही साडी नेसायची पद्धत इतर साड्यांपेक्षा थोडी वेगळी आहे. त्यामागेही एक गोष्ट आहे. त्यावेळी एखादी स्त्री लग्न करून सासरच्या घरी आली की त्यानंतर तिला कधीही घराबाहेर पडायची परवानगी नसे. पती बाहेरगावी नोकरीला असला तरी बायकांना मात्र घर सोडून पतीसोबत राहता यायचं नाही. अशा कायम घरातच राहणाऱ्या स्त्रियांध्ये दमट वातावरणामुळे साडीच्या आतून ब्लाऊज किंवा पेटीकोट घालण्याची प्रथा नव्हती. घरात असताना त्याची गरजही नव्हती. पण ब्राह्मो समाजाचे कार्यकर्ते आणि सरकारी सेवेत असलेले रवींद्रनाथ टागोरांचे मोठे बंधू सत्येंद्रनाथ टागोर कामानिमित्त मुंबईला गेले असताना त्यांनी आपली पत्नी ज्ञानदा नंदिनीदेवी हीलाही आपल्या सोबत मुंबईला घेऊन गेले आणि तिनं मग पारशी समाजातल्या बायकांचे कपडे पाहून साडीच्या आतून लांब बाह्यांचा ब्लाऊज आणि पेटिकोट घालण्याची प्रथा पाडली आणि त्यामुळे बंगालच्या बायका खुलेपणानं समाजामध्ये वावरायला लागल्या. त्या काळी ही खूप मोठी क्रांतीच झाली होती. अशा या बंगालच्या साडीनं कला, संस्कृती, सामाजिक जीवन आणि स्वातंत्र्य चळवळ या सर्वांवर आपला ठसा उमटवला आहे.

अमृता देशपांडे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)