मुंबई- एन्कोर एन्टरटेन्मेंट प्रस्तुत संदिग्ध ही वेब सिरीज झाली आहे. या बेव सिरीजचं दिग्दर्शन रोहित बापट यांनी केले आहे. तर छायांकन मंदार खरे यांनी केले असून मुख्य भूमिका रोहन बोंगाळे व रोहित बापट यांनी साकारली आहे. यात क्षितिज पांडे, अक्षता गाईगवारे, प्रिया करकमकर, आणि योगेश कोटस्थाने या कलाकारांनी काम केलं आहे.
संदिग्ध ही शेवटपर्यंत उत्कंठा वाढवणारी सस्पेन्स मर्डर वेब सिरीज़ आहे. या सिरीजमध्ये सस्पेन्स आहे, थ्रिल आहे, आता पुढे काय अशी उत्कंठा आहे. मर्डर स्टोरीअसली तरी सगळ्या कुटुंबाने एकत्र बघता येईल अशी ही मराठी वेब सिरीज आहे संदिग्ध…… आठ एपिसोडमध्ये असलेली ही वेब सिरीज Hangama play, MX player, Airtel Xstream, vodafone play, Idea Movies वर उपलब्ध आहे.
जेव्हा एखाद्या गोष्टीचं कारण मिळालेलं असतं पण कारण मान्य करायचं कारण मिळालेलं नसतं तेव्हा सगळं संदिग्ध होतं. सिद्धांतला कधीच कळलं नाही की प्राजक्ता अशी का वागली? प्राजक्तालाही समजलं नाही की हे सगळं किती खोल, किती गढूळ आहे? माणूस नेहमी योग्य आणि अयोग्यच्या मध्ये हेलकावे खात असतो पण जेव्हा स्वतःला या दोघांच्या बरोबर मध्ये बघतो तेव्हा त्याला सगळं संदिग्ध वाटू लागतं. इन्स्पेक्टर मल्हार देखील अशाच संदिग्धतेच्या धुरकट वाटेवर चालत आहे. सायलीने आत्महत्या केली आणि आपण सौरभला मारलं. यात योग्य काय आणि अयोग्य काय हे त्यालाही समजत नसतं. जेव्हा मल्हार सिद्धांतची केस घेतो तेव्हा त्याला उलगडा होऊ लागतो की जे सिद्धांतसाठी संदिग्ध आहे तेच मल्हारसाठीही आहे! सिद्धांतला न्याय हवाय आणि मल्हारला उत्तरं. या दोन समांतर जाणाऱ्या विश्वांच्या छेदबिंदूपाशी उरते ती फक्त संदिग्धता!
बरोबर आणि चूक हे प्रश्नांची व्यापलेल्या माणसाला जास्त कळतं कारण बुडणाऱ्याला प्राण वाचवणं किती गरजेचं आहे हे जास्त ठाऊक असतं. प्रेम ही गोष्ट अशी आहे की जिथे विश्वास महत्त्वाचा असतो. कधीकधी अंधविश्वास देखील! या विश्वासाला जरासा धक्का लागला की सगळे भ्रम गाळून पडतात आणि उरते ती संदिग्धता. याच संदिग्धतेचा ठाव घेणारी कथा म्हणजे संदिग्ध !
संदिग्ध शब्दाचा अर्थ हा संशय, मात्र कोणावर, कसा आणि कोणाचा हे या सिरीजमध्ये उत्तमरित्या रेखाटलं आहे. त्यामुळे या बेव सिरीजला उत्तम दाद मिळते आहे.