सत्ताधारी भाजपमध्ये संदोपसुंदी !

नगरसेवकाची मागणी : पालकमंत्र्यांनी चिंचवडमधून निवडणूक लढवावी

पिंपरी – विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना शहरातील सत्ताधारी भाजपमध्ये संदोपसुंदी सुरू झाली आहे. भाजप शहराध्यक्ष तथा विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांची चिंचवड विधानसभा मतदार संघावर दावेदारी असताना स्वपक्षीय नगरसेवकांकडून त्यांना विरोध सुरू झाल्याचे चित्र आहे. नगरसेवक तुषार कामठे यांनी थेट पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच चिंचवडमधून निवडणूक लढवावी, असे पत्र दिल्याने खळबळ उडाली आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील शुक्रवारी महापालिकेत आले होते. यावेळी नगरसेवक तुषार कामठे यांनी त्यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आपल्या पारदर्शक, अभ्यासू, अष्टपैलू नेतृत्त्वामुळे अनेक कार्यकर्त्यांची मागणी आहे की, आपण चिंचवड विधानसभेची निवडणूक लढवावी. आपण या मतदार संघाचे लोकप्रतिनिधी झाल्यास शहराला आपल्यासारखे नेतृत्त्व लाभेल. महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता येईल. तसेच, आपल्या दूरदृष्टीमुळे शहराचा वेगाने विकास होईल.

विशेष बाब म्हणजे, शहरात गटातटाचे राजकारण होणार नाही. पिंपरी-चिंचवड शहर भाजपमध्ये जी सुंदोपसुंदी सुरू आहे ती संपेल, सर्व काही अलबेल होईल. तसेच, आपल्या नेतृत्त्वामुळे भाजपमधील निष्ठावंत गटाची नाराजी दूर होईल. आपण चिंचवड मतदार संघातून प्रतिनिधित्व करावे, ही माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे नगरसेवक तुषार कामठे यांनी म्हटले आहे. या मागणीआडून कामठे यांनी थेट जगताप यांच्या उमेदवारीला विरोध केल्याची चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.