जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये झाली चकमक; कराडसह मुंढे परिसरातील गावांवर शोककळा
कराड – जम्मू- काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना कराड तालुक्यातील मुंढे गावचे सुपूत्र जवान संदीप रघुनाथ सावंत (वय 30) यांना वीरमरण आले. संदीप यांना वीरमरण आल्याची बातमी समजताच मुंढे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
संदीप सावंत 28 सप्टेंबर 2011 रोजी बेळगाव येथे सैन्य दलात भरती झाले होते. जवान संदीप 16 मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत गोळी लागून ते हुतात्मा झाले. संदीप सावंत यांच्या गस्ती पथकाला नियंत्रण रेषेजवळ जंगलात हालचाली दिसल्या. सावंत यांच्यासह पथकातील सहकारी सज्ज झाले.
दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे त्यांना दिसले. दाट धुके व कडाक्याच्या थंडीमुळे दहशतवाद्यांची नेमकी संख्या समजू शकली नाही. संदीप यांनी आणि त्यांच्या पथकाने दहशतवाद्यांशी दोन हात करण्यास सुरुवात केली. मात्र, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात संदीप सावंत आणि गोरखा रायफल्सचे अर्जुन थापा या दोघांना वीरमरण आले. या दोघांनी दाखवलेले शौर्य देश कधीही विसरणार नाही. त्यांच्या बलिदानाची देशाला कायम जाणीव राहिल, अशा शब्दात लेफ्टनंट कर्नल देवेंदर आनंद यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. नौशेरा परिसरात ही घटना घडल्यानंतर संपूर्ण परिसरात नाकेबंदी करण्यात आली. शोधमोहीम सुरु असून लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधण्याचे काम सुरु आहे.
संदीप सावंत हुतात्मा झाल्याची बातमी बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मुंढे येथील ग्रामस्थांना समजली. संदीप यांचे मोठे बंधू शशिकांत यांच्याशिवाय कुटुंबातील अन्य सदस्यांना याबाबत माहिती समजू दिली नव्हती.
संदीप सावंत यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1990 रोजी मुंढे येथे झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विजयनगर (ता. कराड) येथील प्रेमलाकाकी चव्हाण विद्यालयात आणि महाविद्यालयीन शिक्षण कराडच्या शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात झाले होते. तीन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना तीन महिन्यांची मुलगी आहे. मुलीच्या बारशासाठी पाच दिवसांची सुट्टी घेऊन पंधरा दिवसापूर्वीच ते गावी आले होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मुंढे ग्रामस्थ आणि संदीप यांच्या मित्रांना धक्का बसला आहे.
संदीप मनमिळाऊ स्वभावाचे होते, अशी आठवण त्यांच्या मित्रांनी सांगितली. त्यांच्या पश्चात वडील रघुनाथ सावंत, आई अनुसया, भाऊ शशिकांत, पत्नी स्मिता आणि मुलगी रिया असा परिवार आहे. संदीप यांचे पार्थिव उद्या विमानाने पुण्यात येईल. तेथून ते मुंढे येथे आणण्यात येणार आहे. मुंढे ग्रामस्थ संदीपच्या पार्थिवाच्या प्रतीक्षेत आहेत. संदीप सावंत यांच्या हौतात्म्याची बातमी समजताच मुंढे व परिसरातील गावांवर शोककळा पसरली आहे. गावचा सुपूत्र अतिरेक्यांशी लढताना हुतात्मा झाला, याचा अभिमानदेखील ग्रामस्थ आणि युवकांना आहे. मंगळवारी सकाळपासून ग्रामस्थ संदीप यांच्या घरामागील मोकळ्या जागेची स्वच्छता करत आहेत. त्या ठिकाणी संपूर्ण मुंढे, विमानतळ परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.