महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2024 साठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत 45 उमेदवारांची नावे जाहीर केली, मात्र या यादीत बीड मतदारसंघाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. यामुळे बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी धोक्यात असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी धोक्यात?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा निसटता पराभव केला होता. त्यांच्या विजयाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते आणि बीडमध्ये एक नवीन तरुण नेतृत्व उभे राहिले होते. परंतु, त्यांच्या कारकिर्दीत विकासकामांवरून आणि राजकीय तणावांमुळे अनेक आरोप झाले, ज्यामुळे त्यांची लोकप्रियता कमी होत चालल्याची चर्चा आहे.
क्षीरसागरांचे राजकीय वजन घटले?
नवनिर्वाचित लोकसभा खासदार बजरंग सोनवणे आणि संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय तणाव आणि तालुक्यातील काही माजी सहकाऱ्यांनी त्यांची साथ सोडल्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे. माजी आमदार सुनिल धांडे आणि इतर काही प्रमुख सहकाऱ्यांनीही क्षीरसागरांची साथ सोडल्यामुळे त्यांचे राजकीय वजन कमी झाल्याचे बोलले जात आहे.
नव्या चेहऱ्याच्या शोधात शरद पवार?
या सर्व घडामोडींमुळे शरद पवार बीडमध्ये नवीन उमेदवार शोधण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगे पॅटर्न यशस्वी ठरल्यामुळे यावेळी मराठा उमेदवार देण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे शरद पवार संदीप क्षीरसागर यांना पुन्हा संधी देतात की नवीन चेहरा निवडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकूणच, बीड मतदारसंघात संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारीवर शरद पवार काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.