निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आर. के. पद्मनाभन यांची बदली
पिंपरी – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संदीप बिश्नोई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पद्मनाभन यांच्या निवृत्तीला अवघा 40 दिवसांचा कालावधी राहिला असल्याने निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे ही बदली करण्यात आली आहे.
एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा निवृत्तीचा काळ सहा महिन्यांपेक्षा कमी असेल तर त्या अधिकाऱ्याकडे निवडणुकीबाबत काम देण्यात येऊ नये, असा निवडणूक आयोगाचा नियम आहे. याच नियमाच्या आधारे आर. के. पद्मनाभन यांची बदली करण्यात आली आहे. पद्मनाभन यांच्या निवृत्तीला अवघे 40 दिवस शिल्लक राहिले आहेत.
याच कालावधीत विधानसभा निवडणुका होणार असल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संदीप बिश्णोई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र पद्मनाभन यांची कोणत्याही ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली नाही.
पिंपरी-चिंचवडचे नवीन पोलीस आयुक्त संदीप बिश्णोई यांचे शिक्षण बीए, एलएलबी पर्यंत झाले आहे. 1989च्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. एसआरपीएफ व महामार्ग वाहतूकचे अप्पर पोलीस महासंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर ते कसे नियंत्रण ठेवणार याबाबत पिंपरी-चिंचवडकरांमध्ये उत्सुकता आहे.
हिंजवडीतील वाहतूक कोंडी केली कमी
आर. के. पद्मनाभन यांना पिंपरी चिंचवडचे पहिले पोलीस आयुक्त होण्याचा मान मिळाला. पूर्वी महामार्ग वाहतूक विभागात केलेल्या कामाचा अनुभव पणास लावून वर्षभरापूर्वी त्यांनी हिंजवडी येथील वाहतुकीचा प्रश्न हाताळला. येथील वाहतूक कोंडी पाऊण तासांनी कमी करण्यात त्यांना यश आले. यामुळे शहरवासियांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. तसेच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी त्यांनी नो-एन्ट्रीतून येणाऱ्या वाहन चालकांवर भादवि 279 प्रमाणे गुन्हे दाखल केले.
“फोन अ फेन्डला’ ही प्रतिसाद
अपुरे मनुष्यबळ असूनही त्यांनी “फोन अ फ्रेंड हा उपक्रम राबविला. त्यासाठी पोलीस ठाण्यातील आठ जणांची एक टीम याप्रमाणे मनुष्यबळानुसार आठ ते दहा टीम तयार केल्या. अवघ्या सात मिनिटांमध्ये किमान पाच पोलीस घटनास्थळी पोहचू लागले. याबाबत आयुक्त स्वतः नागरिकांना फोन लावून माहिती घेत होते. घटनास्थळी न जाणाऱ्या तसेच उशिराने पोहोचणाऱ्या पोलिसांना ते परेडची शिक्षा देत होते.
रोडरोमिओंवर वचक
सायंकाळच्यावेळी दुचाकीवरून फिरून हुल्लडबाजी करणाऱ्या रोडरोमिओंना त्यांनी चाप लावला. यासाठी वाहतूक पोलीस आणि पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने ठिकठिकाणी नाकाबंदी केली. वर्षभरात 72 हजारांहून अधिक वाहन चालकांवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला.
“…म्हणून गुन्हेगारी वाढली
कोणताही गुन्हा असो, तो दाखल करा, असे आदेश पद्मनाभन यांनी पोलिसांना दिले होते. अनेकदा गुन्हा दाखल न करणाऱ्या अधिकाऱ्यांची त्यांनी बदली केली. यामुळे पूर्वी टाळाटाळ करणारे पोलीस गुन्हे दाखल करू लागले. यामुळे गेल्या वर्षभरात गुन्ह्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले.
सर्वांसाठी “ओपन डोअर’
वरिष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी सहसा नागरिकांना भेटत नाहीत. मात्र पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन हे सर्वासामान्य नागरिकांना भेटत होते. जर पोलीस ठाण्यात प्रतिसाद मिळाला नाही तर शहरातील कोणताही नागरिक थेट आयुक्तांची भेट घेऊ शकत होता.