अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्राचा ‘संदीप और पिंकी फरार’ गेल्या वर्षात खूप चर्चा झालेला सिनेमा होता. यावर्षी मार्चमध्ये तो थिएटरमध्ये रिलीजदेखील झाला होता.
मात्र, करोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन लागू झाला आणि या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर म्हणावे तसे यश मिळू शकले नाही. आता ती कसर भरून काढण्यासाठी “संदीप और पिंकी फरार’ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केले जाणार आहे.
त्यामुळे ज्या प्रेक्षकांना थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघता आलेला नाही, त्यांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा बघण्याचा आनंद मिळू शकणार आहे. हा सिनेमा 2018 मध्येच तयार झाला होता. गेल्या वर्षीच तो थिएटरमध्ये रिलीज होणार होता. मात्र, करोनामुळे ते शक्य झाले नव्हते.
यामध्ये अर्जुन कपूरचे नाव संदीप आणि परिणिती चोप्राचे नाव पिंकी असावे. असे स्वाभाविकपणे वाटू शकते. मात्र, सिनेमात बरोबर उलट स्थिती आहे. अर्जुन कपूर हरियाणातील एका पोलीस अधिकाऱ्याच्या रोलमध्ये आहे. तर परिणिती चोप्रा कॉर्पोरेट विश्वातील एक महत्त्वाकांक्षी मुलगी आहे. हे दोघे काय धमाल करतात, हे आता प्रेक्षकांनी स्वतःच बघावे.