वाळूतस्कारांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्‍या

संग्रहित छायाचित्र

पावणेदोन कोटींचा मुद्देमाल जप्त; सतरा जणांवर गुन्हा दाखल

श्रीगोंदा – तालुक्‍यातील सांगवी दुमाला येथील भीमा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूउपसा करणाऱ्यांवर सोमवारी सायंकाळी पोलिसांच्या पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत वाळूउपसा व वाहतूक करणारी वाहने व वाळूसाठा असा एकूण जवळपास पावणेदोन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैधरित्या वाळूउपसा व वाहतूक केल्याप्रकरणी सतरा जणांवर श्रीगोंदा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यातील बारा जणांना अटक करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक जयंतकुमार मीना, विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या पथकाने तालुक्‍यातील सांगवी दुमाला येथील भीमा नदीपात्रात छापा टाकला. या छाप्यात अवैधरित्या वाळूउपसा करणारी जेसीबी यंत्रे, ट्रॅक्‍टर, ट्रक आणि वाळूसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईत चार जेसीबी मशीन, चार ट्रॅक्‍टर व ट्रॉली, एक ट्रक आणि चाळीस ब्रास अवैध वाळूसाठा असा एकूण 1 कोटी 81 लाख 20 हजार किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.या वाहनांचा व वाळूसाठ्याचा पंचांच्या साक्षीने पंचनामा करून ती वाहने पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहेत.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल श्रीरंग आजबे यांच्या फिर्यादीवरून सतरा जणांविरुद्ध श्रीगोंदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी भागचंद कोळपे (रा.हंगेवाडी), अनिल बाळासाहेब घाडगे (रा. इनामगाव, ता.शिरूर), सुनील चोर, भैय्या काकडे, रविराज रतन कोळपे, अनिल भोईटे, महेंद्र भगवान नलगे, राहुल नलगे, दत्तात्रय बाळासाहेब भंडलकर, गणेश शितोळे, महेश दिनकर नलगे, सचिन जयवंत मोरे, सागर राजू ठोकळे (सर्व रा.सांगवी दुमाला), नाना प्रभाकर महारनोर (रा.काष्टी), प्रवीण खंडू भोईटे (रा.ढोरजा), विनोद रवी दास (रा. हजारीबाग, झारखंड), नितीन हौसराव कोपनर (रा. गणेशा) या सतरा जणांविरुद्ध श्रीगोंदा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला असून बारा जणांना अटक करण्यात आले आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गावीत, पोलीस कॉन्स्टेबल करनोर, देवकाते, संभाजी वाबळे, प्रकाश वाघ, भापकर यांचा समावेश होता.

दरम्यान, प्रांताधिकारी गोविंद दानेज यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर आठवड्याभरात पोलिसांनी अवैध वाळूतस्करी विरोधात मोठी कारवाई केली. वाळूतस्करांना कारवाईबाबत थांगपत्ता लागू नये म्हणून विशेष खबरदारी घेत अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी नगरहून खासगी ट्रॅव्हल्समधून सिव्हिल कपड्यांवर पोलिसांची तुकडी आणली होती. आम्हाला नदीमध्ये रक्षा विसर्जन करायचे आहे, भीमा नदीकडे हाच रस्ता जातो का? असे विचारून सांगवीतील लोकांकडून खुबीने रस्त्याची माहिती घेतली. लोकांनी रस्ता दाखविल्याने पोलीस थेट नदी पात्रात पोहोचले आणि अवैध वाळूतस्करी करणाऱ्यांना रंगेहाथ पकडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)