हवेली अतिरिक्त तहसील कार्यालयाकडून कारवाई, बेकायदा वाहतूक सुरूच
पिंपरी (प्रतिनिधी) – शहरात आणि शहराबाहेरून वाळू, मुरूम, डबर, क्रशर, खडी यांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. आकुर्डी येथील हवेली अतिरिक्त तहसील कार्यालयाकडून (पिंपरी-चिंचवड) करण्यात येणाऱ्या कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे. काही जण दुसऱ्यांदा अशाप्रकारे बेकायदा वाहतूक करताना आढळले आहेत.
गेल्या साडेआठ महिन्यांत अशाप्रकारे अवैध वाहतूक केलेली तब्बल 60 वाहने पकडण्यात आली. त्यांच्याकडून अतिरिक्त तहसील कार्यालयाने (हवेली) दंडापोटी 34 लाख 29 हजार रुपयांची रक्कम वसूल केली आहे.
शहरात प्रामुख्याने चिखली, मोशी, चऱ्होली, पिंपळे निलख या पट्ट्यात वाळू, मुरूम, डबर, क्रशर, खडी यांची बेकायदा वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याशिवाय, शहराबाहेरून दौंड, वाघोली, हिंजवडी, देहू आदी पट्ट्यातूनही अशी वाहतूक होत असल्याचे समोर येत आहे.
वाळू आणि मुरूम माफीयांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे अतिरिक्त तहसील कार्यालयाने एकदा दंडाची कारवाई केल्यानंतर देखील काही जणांची वाहने पुन्हा पकडण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. अतिरिक्त तहसील कार्यालयाकडून 1 एप्रिल ते 20 डिसेंबर या कालावधीत केलेल्या कारवाईची माहिती घेतली असता ही बाब समोर आली आहे. गेल्या साडेआठ महिन्यांत एकूण 60 वाहने तहसील कार्यालयाच्या पथकाने पकडली. त्यांच्याकडून वाळू, मुरूम, खडी, क्रशर, डबर आदी जप्त करण्यात आले. एकूण 177.5 ब्रास इतक्या साहित्यासाठी 34 लाख 29 हजार 450 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
नदीकाठाजवळ होतेय उत्खनन
शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या पात्रात मुरूम टाकून एकीकडे नदीपात्र बुजविण्याचे उद्योग सुरू आहेत. तर, दुसरीकडे नदीकाठाजवळील मुरुमाबरोबरच मातीचे अवैध उत्खनन केले जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या जमिनी खचत आहेत. त्याशिवाय, मोकळ्या जागांवरील मातीचे देखील उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. चिखली, मोशी, चऱ्होली, पिंपळे निलख या पट्ट्यातील वाळू, मुरूम, माती चोरांना पायबंद कोण घालणार, हा प्रश्न कायम आहे. तहसील कार्यालयाकडून त्यांच्याविरुद्ध दंडाची कारवाई होत असली तरी वाळू आणि मुरूम माफीया त्याला जुमानत नसल्याचे समोर आले आहे.
वाळू, मुरूम, खडी, डबर, क्रश आदी साहित्यांची अनधिकृत वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध फिरत्या पथकामार्फत कारवाई करण्यात येते. पिंपरी-चिंचवड शहर आणि शहराबाहेरून देखील अशा प्रकारची वाहतूक झाल्याचे आढळले आहे.
– गीता गायकवाड, अपर तहसीलदार, हवेली अतिरिक्त तहसील कार्यालय, (पिंपरी-चिंचवड)