नवी दिल्ली – अमेरिकेने रशियाच्या तेल कंपन्यांवर निर्बंध घातले असले तरी त्याचा परिणाम किमान दोन महिने भारतावर होणार नाही. दोन महिन्यानंतर भारतातील तेल शुद्धीकरण कंपन्यांच्या कामकाजावर काही प्रमाणात परिणाम शक्य आहे असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर 2022 मध्ये अमेरिकेने रशियाचे तेल 60 डॉलरपेक्षा जास्त दरावर विकता येणार नाही सांगितले होते. त्यामुळे युरोप आणि अमेरिकेची जहाजे यासाठी उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत रशियन जहाजाचा वापर तेल पुरवण्यासाठी केला जात होता. आता रशियाच्या जहाजावर निर्बंध घातले आहेत. अमेरिकेच्या या निर्णयाच्या अंमलबजावणी 12 मार्चपासून होणे अपेक्षित आहे. तोपर्यंत रशियाकडून भारताला होणार्या तेल पुरवठ्यावर कसलाही परिणाम होणार नाही.
10 जानेवारी रोजी ज्या तेलाची बुकिंग करण्यात आलेली आहे ती जहाजे भारतात येऊ शकतील. त्यानंतर आलेल्या जहाजांना भारतात थांबण्याची परवानगी दिली जाणार नाही. अमेरिकेच्या निर्णयावर रशियाने अजून प्रतिक्रिया दिलेली नाही.
रशिया -युक्रेन युद्धाअगोदर भारत रशियाकडून आपल्या पूर्ण गरजेच्या केवळ एक टक्के खनिज तेल आयात करत होता. आता हे प्रमाण वाढून 40% वर गेले आहे. आता भारताला पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठी दोन महिन्याचा वेळ आहे. यासाठी बरेच पर्याय भारताकडे उपलब्ध असून त्याचा भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेवर परिणाम होणार नाही.