इराणवर पुन्हा निर्बंध !

अमेरिकेचा आदेश न मानण्याचे इराणचे आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन

तेहरान – अमेरिकेने संयुक्तराष्ट्रांमार्फत इराणवर पुन्हा निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्तराष्ट्रांमार्फत इराणवर पुर्वी ज्या प्रकाराचे निर्बंध लागू केले होते ते आज पासून पुन्हा लागू होत असल्याची घोषणा अमेरिकेने केली आहे.

तथापि अमेरिकेने हा निर्णय एकतर्फी घेतला असून अमेरिकाचा हा निर्णय मानु नये असे आवाहन इराणने आंतरराष्ट्रीय समुदायाला केले आहे. आमच्या निर्णयाला विरोध केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा अमेरिकेने दिला आहे.

इराणचे विदेश मंत्री मोहंमद जवाद जरीफ यांनी अमेरिकेच्या या निर्णयावर जोरदार आगपाखड केली. त्यांनी म्हटले आहे की अमेरिकेच्या या कृती मागे कोणताही तर्क नाही त्यांनी मनमानी पद्धतीने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान इराणाच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्डने त्याचे अमेरिकेला लष्करी कारवाईच्या स्वरूपात परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.

अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ यांनी म्हटले आहे की, संयुक्तराष्ट्राच्या सदस्य असलेल्या देशांनी आम्ही लागू केलेले हे निर्बंध झुगारण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील.

दरम्यान जगातल्या सर्वच महत्वाच्या देशांनी अमेरिकेच्या या एकतर्फी निर्णयाला विरोध केल्याने या विषयावरून अमेरिका एकटी पडली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. इराणने अमेरिकेशी सन 2015 मध्ये अणू करार केल्यानंतर अमेरिकेने इराणवरील निर्बंध मागे घेतले होते. परंतु इराणने या कराराचा भंग केल्याने ट्रम्प प्रशासनाने दोन वर्षांपुर्वी इराणशी झालेला करार रद्द बातल ठरवला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.