सणबूर – पाटण मतदारसंघातील शेत/पाणंद रस्त्यांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा, ठाणे जिल्हा पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील 38 गावातील सुमारे 50 कि.मी. लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांची कामे ही राज्य शासनाने नव्याने सुरु केलेल्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेतून मंजूर होण्यासाठी रोजगार हमी मंत्री ना. संदिपान भुमरे यांचेकडे शिफारस केली होती. त्यानुसार पाटणमधील 9 गावातील अतिरिक्त पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.
पाटण मतदारसंघातील 28 गावातील सुमारे 35.500 कि.मी. लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेच्या सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पुरवणी आराखडयात समावेश करण्यात आला आहे. तसेच या रस्त्यांना मंजूरी देण्यात आली असल्याचा शासन निर्णय दि. 23 डिसेंबर 2022 रोजी राज्य शासनाचे नियोजन विभाग (रोहयो) यांनी पारित केला होता. दरम्यान, उर्वरित 9 रस्त्यांचाही पुरवणी आराखडयात समावेश करण्यात आला असल्याने 14.500 कि.मी. रस्त्यांचे कामांना सदर योजनेअंतर्गत मंजूरी देण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री ना. देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांची शेत/पाणंद रस्त्यांअभावी होणारी गैरसोय लक्षात घेऊन राज्य शासनाच्या रोजगार हमी विभागाकडे शेत/पाणंद रस्ते मंजूर होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे पालकमंत्री ना. देसाई यांचे प्रयत्नातून सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत दोन टप्प्यामध्ये आतापर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघातील तब्बल 63 गावांतील 69 कि.मी. लांबीचे शेत पाणंद रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.
तसेच सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पुरवणी आराखडयांतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील 28 गावांतील सुमारे 35.500 कि.मी. लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश केला होता. तर उर्वरित 9 रस्त्यांचाही पुरवणी आराखडयात समावेश करण्यात आला असल्याने 14.500 कि.मी. रस्त्यांचे कामांना मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत मंजूरी देण्यात आली असल्याचा सुधारित शासन निर्णय राज्य शासनाचे नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) यांनी दि. 27 जानेवारी 2023 रोजी पारित केला आहे.
यामध्ये ठोमसे-लोहारवस्ती ते शंभूराज मंदिर पाणंद रस्ता 2 कि.मी., येराडवाडी ग्रामपंचायत ते पाणी पुरवठा विहिर-माकडी शिवार पाणंद रस्ता 1 कि.मी., लेंढोरी प्राथमिक शाळा ते नदीपर्यंत पाणंद रस्ता 2 कि.मी., ऊरुल महेश निकम यांचे शेड ते गाव विहिर पर्यंत पाणंद रस्ता दीड कि.मी., कोरिवळे-पाळेकरवाडी पाणंद रस्ता दीड कि.मी., ढेरुगडेवाडी (येराड) ढेरुगडेवाडी-येराड-हुंबरपेढा पाणंद रस्ता दीड कि.मी., कुठरे-पागेवाडी-वाझोली पाणंद रस्ता 1 कि.मी., झाकडे पाणंद रस्ता 2 कि.मी., माजगाव-ऊरुल पाणंद रस्ता 2 कि.मी. या 9 गावांतील 14.500 कि.मी. लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश असून मातोश्री शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना निधी राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत उपलब्ध होऊन या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.